किसान सन्मान योजनेसाठी शेतकऱ्यांना निरोप

संजय तेली यांचे आवाहन : केंद्र सरकारने जमीन धारणेची अटी केल्या शिथिल

राजगुरूनगर – केंद्र सरकार पुरस्कृत “पंतप्रधान किसान सन्मान’ योजनेसाठी खेड तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी तलाठ्यांकडे सर्व कागदपत्रांसह तात्काळ अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रांत संजय तेली यांनी केले आहे.

“पंतप्रधान किसान सन्मान’ योजनेत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दरवर्षी मिळणार आहेत. या योजनेत (पाच एकरच्या) दोन हेक्‍टरच्या आत क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांचे सर्व कागदपत्रांसह महसूल विभागामार्फत लोकसभा निवडणूक आचारसंहितेपुर्वीच भरण्यात आले होते. केंद्र शासनाने जमीन धारणेची अट शिथील करुन सर्वच शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी करण्याचे निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांनी 30 जूनपर्यंत तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी यांच्याकडे आवश्‍यक कागदपत्रांसह अर्ज सादर करण्यासाठी मुदत दिली आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याअगोदर केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहीर करुन महसूल, ग्रामसेवक, कृषी कर्मचारी वर्गाची गावोगावी नेमणुका करुन शासकीय पातळीवर दोन हेक्‍टरच्या आतील शेतकऱ्यांचे अर्जासह, कागदपत्रे घेऊन युद्धपातळीवर कामकाज उरकले. मात्र ऑनलाईन पद्धतीमुळे कुशल मनुष्यबळ कमी पडुल्याने वेळोवेळी त्यात केलेल्या तांत्रिक बदलामुळे कर्मचाऱ्यांना मनस्ताप सहन करुन रात्रंदिवस काम करावे लागले. पहिल्या टप्यातील जाहिर केलेल्या दोन हजारांचा अनुदान रक्कम कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात आला हे अद्यापही गुलदस्त्यात असताना 17व्या लोकसभा निवडणुकीनंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाने सर्वच शेतकऱ्यांना ही योजना लागू केली आहे. या अगोदर अर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना काहीही मिळाले नसल्याचे गृहित धरुन या योजनेकडे साशंकतेने बघत प्रतिसाद मिळत नसल्याचे कर्मचारी वर्गाचे म्हणणे आहे. त्यामुळे अर्ज भरुन माहिती कागदपत्रे मिळवण्यासाठी कर्मचारी आता ज्यांनी अर्ज सादर केले नाही अशा शेतकऱ्यांना निरोप पाठवून अर्ज भरण्यासाठी आर्जव करताना दिसत आहेत.

खेड तालुक्‍यात एकूण 1 लाख 6 हजार 120 शेतकरी खातेदार असून, 78 हजार 552 शेतकऱ्यांचे दोन हेक्‍टरपेक्षा कमी क्षेत्र आहे. 27 हजार 538 दोन हेक्‍टरपेक्षा जास्त जमिनीचे शेतकरी संख्या आहे. शेतकरी सन्मान योजनेत पहिल्या टप्प्यात खेड तालुक्‍यातून 31 हजार 704 शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे.
– सुचित्रा आमले, तहसीलदार खेड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)