अडीच लाख पत्रांमधून मतदार जागृतीचा संदेश

गुरूनाथ जाधव
सातारा – सातारा जिल्ह्यातील 2 लाख 50 हजार विद्यार्थी सामुहिकरित्या पत्रलेखनातून मतदान जागृतीचा संदेश देणार आहेत. सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने दिनांक 27 मार्च 2019 रोजी इयत्ता 5 वी ते 9 वी व इयत्ता 11 वीच्या जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्याथी शाळेत तसेच महाविद्यालयात पत्रलेखन करणार आहेत. खऱ्या अर्थाने भविष्यातील सुज्ञ सुजाण नागरिक घडण्यासाठी शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी होणे आवश्‍यक आहे. आपला मतदानाचा आधिकार बजावण्याची भुमिका व त्याचे महत्व जाणण्यासाठी विद्यार्थ्यांना पत्रलेखनातून संदेश देण्याची संकल्पना अकोला येथे राबविण्यात आली होती.त्याचे अनुकरण करत सातारा जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी आधिकारी कैलास शिंदे यांच्या मागदर्शनाखाली सातारा जिल्ह्यातही ही संकल्पना राबवित असल्याचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी दिली.

आजच्या इंटरनेट, इमेल सोशल मीडियाच्या जमान्यात पत्रलेखन करणे तसे कालबाह्यच झाले आहे. शालेय अभ्यासक्रमामध्ये विनंती पत्र, नोकरी, अभिनंदन, तक्रार, या प्रकारची अनेक पत्रे अभ्यासली आहेत. विद्यार्थ्यांनी लिहतं व्हावं तसेच त्यांच्या कल्पनाना वाव मिळण्यासोबतच मतदान जागृती व्हावी अश्‍या विचाराने ही संकल्पना सातारामध्ये प्रथमत:च राबविण्यात येत आहे. यासाठी सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यातुन विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होणार आहेत. यात स्वत:च्या कल्पकतेतून आपल्या आई वडिलांना पत्र लिहून त्यांची मतदान जागृती करायची आहे. लिगल आकाराच्या रेषांच्या पानावर निळया शाईने पत्र लिहुन आपल्या शाळेत व महाविद्यालयात जमा करायची आहेत. त्यानंतर शाळांनी ती सर्व पत्रे तालुक्‍यातील संपर्क शाळामध्ये 28 ते 30 मार्च पर्यंत जमा करायची आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)