दक्षिण आफ्रिकेवर 5-1 ने विजय
भुवनेश्वर – वरूणकुमार व हरमानप्रीतसिंग यांच्या अचूक कामगिरीच्या जोरावर भारताने आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ आयोजित पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत एकतर्फी अजिंक्यपदावर मोहोर नोंदाविली. अंतिम लढतीत त्यांनी दक्षिण आफ्रिकेवर 5-1 असा सफाईदार विजय मिळविला.
ड्रॅगफ्लिकर वरूणकुमार याने दुसऱ्या व 49 व्या मिनिटाला गोल केला. हरमानप्रीत याने 11 व्या व 25 व्या मिनिटाला गोल नोंदविला. विवेक सागरप्रसाद याने 35 व्या मिनिटाला गोल करीत संघाच्या विजयास हातभार लावला. आफ्रिकेचा एकमेव गोल रिचर्ड पॉट्झ याने 53 व्या मिनिटाला केला. भारत व आफ्रिका या दोन्ही संघांनी ऑलिंपिक पात्रता स्पर्धेत यापूर्वीच प्रवेश निश्चित केला आहे. आशियाई विजेत्या जपानने अमेरिकेचा 4-2 असा पराभव केला आणि तिसरे स्थान घेतले.
भारतीय संघाने अपेक्षेनुसार पहिल्या मिनिटापासून खेळावर नियंत्रण घेतले होते. दुसऱ्याच मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचा लाभ घेत वरूणकुमार याने खाते उघडले. पुन्हा 11व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरद्वारा हरमानप्रीतने संघास 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतरास पाच मिनिटे बाकी असताना भारताचा पेनल्टी स्ट्रोकची संधी मिळाली. त्याचा पुरेपूर फायदा घेत हरमानप्रीत याने भारतास 3-0 अशी आघाडी मिळवून दिली.
उत्तरार्धात भारताच्या वरूणकुमार व सागरप्रसाद यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवित संघाची बाजू बळकट केली. रिचर्ड याने भारताची आघाडी कमी केली.