कायद्यापुढे स्त्री-पुरुष समान (भाग-२)

व्यभिचाराच्या बाबतीत स्त्री-पुरुष भेदभाव कायद्याने होता कामा नये, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. अविवाहित पुरुषाने विवाहित स्त्रीबरोबर संबंध ठेवल्यास तो व्यभिचार ठरत नाही. मात्र, हीच गोष्ट विवाहित पुरुषाने केल्यास भारतीय दंडविधानाच्या कलम 497 अन्वये तो व्यभिचार ठरतो. खरे तर व्यभिचारात स्त्री ही पुरुषाइतकीच दोषी असूनसुद्धा तिला दोषी मानले जात नाही याबाबत काहींनी नाराजी व्यक्त केली होती. आता विवाहाचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी पती आणि पत्नी दोघांची असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले असून, एकट्या पुरुषालाच का दोष द्यायचा, असा प्रश्नही उपस्थित केला आहे.

कायद्यापुढे स्त्री-पुरुष समान (भाग-१)

वास्तविक, सामाजिक आणि कौटुंबिक विकिरणाची अशी प्रकरणे आता न्यायालयांसाठीही गुंतागुंतीची ठरू लागली आहेत. साहजिकच त्यामुळे यासंदर्भातील कायद्यांवरही प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. आता मात्र अशा संबंधांमध्ये केवळ पुरुषावर शोषणाचा आरोप ठेवून त्याला डोळे बंद करून दोषी मानता येणार नाही. गेल्या काही वर्षांत केवळ व्यभिचाराच्याच नव्हे तर हुंडाविरोधी कायद्याचाही दुरुपयोग केला गेल्याची असंख्य प्रकरणे समोर आली आहेत. शारीरिक शोषणाचेही अनेक खटले खोटे आणि सूड उगवण्याच्या मानसिकतेतून दाखल केल्याचे समोर आले. भारतीय दंडविधानाच्या कलम 498 (अ) चा देखील दुरुपयोग होत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने अनेकवेळा म्हटले आहे. कारण अशा प्रकरणांमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण अवघे दोन टक्का एवढेच आहे. अगदी याच प्रकारे 497 कलमाच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या एका याचिकेत समानतेच्या तत्त्वाचा अपरोक्षपणे भंग होत असल्याकडे लक्ष वेधण्यात आले, कारण अशा प्रकरणांमध्ये पुरुषालाच दोषी मानण्याची तरतूद कायद्यात आहे. यासंदर्भातील एक विरोधाभासही लक्षवेधी आहे. व्यभिचाराच्या कायद्यांमधील तरतुदींवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच असे म्हटले होते की, विवाहित महिलेच्या पतीची सहमती असल्यास विवाहित पुरुषाशी स्त्रीने जोडलेले संबंध गुन्हा ठरत नाहीत. याचा दुसरा अर्थ, पत्नी ही पतीची मालमत्ता आहे असा घ्यायचा का, असा प्रश्न उपस्थित झाला. म्हणजेच नात्यांच्या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकारच महिलेला उरणार नाही. उलट महिला एक वस्तू म्हणूनच ग्राह्य धरली जाईल. हा खरोखर विरोधाभासच आहे. एवढेच नव्हे तर व्यभिचाराच्या प्रकरणांत तक्रार दाखल करण्याचा अधिकार अशा पुरुषाला आहे, ज्याची पत्नी अन्य पुरुषाबरोबर संबंध प्रस्थापित करते. मात्र, अशा स्त्रीला तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही, जिचा पती अशा प्रकारचे संबंध प्रस्थापित करतो. या दृष्टीने पाहायला गेल्यास हा कायदा लैंगिक असमानताच दृढ करणारा ठरतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपल्या सामाजिक पर्यावरणाचा विचार केल्यास अशा संबंधांमुळे स्त्रीला अधिक सामाजिक आणि मानसिक अवहेलना सहन करावी लागते, हे खरे आहे. परंतु खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला पुरुष आणि त्याच्या कुटुंबालाही कमी अवहेलना सहन करावी लागते, असे नाही. त्यालाही ते तितकेच त्रासदायक ठरते. आपला कायदा केवळ स्त्रीलाच सर्व प्रकारच्या लैंगिक शोषणापासून संरक्षण देतो, असा एक मतप्रवाह अलीकडील काळात सातत्याने पुढे येताना दिसतो तो पूर्णतः अनाठायी अथवा गैर आहे असे म्हणता येत नाही. याचा परिणाम म्हणूनच खोट्या तक्रारींची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते. अशा परिस्थितीत, महिलांना संरक्षण देणाऱ्या कायद्यामुळे त्यांच्या अस्मितेचे रक्षण करण्यात किती यश मिळाले आणि त्यांचा दुरूपयोग किती झाला, याचा आढावा घेणे गरजेचे ठरले आहे. ज्या देशात महिलांशी होणाऱ्या गैरव्यवहारांचे प्रमाण सातत्याने वाढताना दिसते, त्याच देशात न्यायालयाला अशी टिप्पणी करावी लागते, याचा अर्थ महिलांनीही जाणून घेतला पाहिजे. त्यांनी अशा प्रकारची प्रलोभने वेळीच ओळखली पाहिजेत आणि त्यासाठी सतर्क राहिले पाहिजे. साहजिकच अशा प्रकारच्या संबंधांचे परिणाम आणि त्याच्याशी निगडित शारीरिक, मानसिक शोषण यापासून बचाव करण्यासाठी महिलांनी सजग बनायला हवे.

महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची अनेक प्रकरणे अक्षरशः भयावह आहेत; परंतु अशा पीडितांना न्याय देण्यासाठी बनविलेल्या कायद्यांची कठोरता कमी करण्याचे काम महिलांकडून दाखल झालेली खोटी प्रकरणेच करीत असतील तर ते अधिक दुर्दैवी आहे. स्वाभाविकपणे, महिलांनी अशा प्रकारचे खोटे खटले दाखल करण्याऐवजी सजग बनण्याकडे अधिक लक्ष द्यायला हवे. कोणते नाते आपली वाट चुकवू शकते आणि कोणते नाते खऱ्याखुऱ्या स्नेहभावाची जोपासना करू शकते, याचा अंदाज घ्यायला शिकले पाहिजे. आपल्या सुरक्षिततेसाठी अशा प्रकारच्या संबंधांच्या बाबतीत स्त्रियांनी जागरूक बनणे, हीच सुशिक्षित आणि सशक्त होण्याची खरी खूण आहे. आपण शोषणाची शिकार ठरू शकतो, अशा कोणत्याही प्रलोभनापासून त्यांनी दूर राहायला हवे.

– श्रीकांत देवळे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)