राज्यातील 28 जिल्ह्यात “मेमरी क्‍लिनिक’ : एकनाथ शिंदे

मुंबई : अल्झायमर आणि स्मृतीभ्रंशाच्या रुग्णांवर उपचार आणि त्यांच्या नातेवाईकांना समुपदेशनासाठी राज्यातील 28 जिल्हा रुग्णालयांमध्ये “मेमरी क्‍लिनिक’ सुरु करण्यात आले आहेत. आतापर्यंत सुमारे 2200 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून 300 रुग्णांवर स्मृतीभ्रंशाचे उपचार सुरू आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
देशभरासह राज्यातही अल्झायमर आणि स्मृतीभ्रंशाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

देशात 4.1 दशलक्ष रुग्ण या आजाराने ग्रस्त आहेत. बदली जीवनशैली आणि वाढता ताण यामुळे या आजाराच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे मत तज्ज्ञांचे आहे. राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये मेमरी क्‍लिनिक सुरु करून त्या माध्यमातून अल्झायमरविषयी “अर्ली डिटेक्‍शन सेंटर’ सुरु झाले आहे. त्याद्वारे रुग्णांच्या स्मरणशक्तीची विविध चाचण्यांच्या माध्यमातून तपासणी करण्यात येते. स्मरणशक्तीविषयी येणाऱ्या अडचणींचे अवलोकन करून त्यांचे वर्गीकरण करून रुग्णांवर औषधोपचार करण्यात येतो.

जिल्हा रुग्णालयांमध्ये रोज मानसिक आजारासंबंधी तपासणी केली जाते. मात्र स्मृतीभ्रंशसंबंधी आजाराच्या रुग्णांची आठवड्यातून दोन दिवस तपासणी केली जाते. आतापर्यंत रायगड, अहमदनगर, अमरावती, भंडारा, बुलढाणा, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, उस्मानाबाद, परभणी, नाशिक, सिंधुदूर्ग, वर्धा, नंदूरबार, सातारा, चंद्रपूर, पुणे, ठाणे, नागपूर, रत्नागिरी, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पालघर, औरंगाबाद, जालना, हिंगोली, लातूर, बीड, नांदेड, अकोला, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यामंध्ये मेमरी क्‍लिनिक सुरू करण्यात आली आहेत, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)