अबाऊट टर्न: मेहबूबा

हिमांशू

मी कुणाचीच मेहबूबा नाही… पण म्हणून काय झालं? अनेक मेहबूबा बघितल्यात मी. त्यांच्या प्रेमकहाण्या, प्रेमभंग, पुनर्मीलन, मनोमीलन वगैरे आता सवयीचं झालंय. त्यामुळं “ते माझी मेहबूबा आहेत. माझं त्यांच्यावर प्रेम आहे. त्यांचं माझ्यावर इश्‍क आहे,’ अशा जाहीर वक्‍तव्यांचं फारसं आश्‍चर्य हल्ली वाटत नाही. एकमेकांच्या प्रेमात पडल्याचं सांगणारे दोघे पुरुष असले तरी, काही दिवसांपूर्वीच त्यांनी एकमेकांची लायकी काढली असली तरी, एकमेकांचा भ्रष्टाचार उघड केला असला तरी! खरं तर हल्ली मला कशाचंच काही वाटेनासं झालंय. कधी कुणी माझ्या प्रेमातच पडलेलं नसल्यामुळं कदाचित मी बथ्थड होत चाललेय. माझ्या संवेदना बोथट झाल्यात. कुणीही कुणाकडेही जाणार, जाहीरपणे मिठ्या मारणार, पुन्हा कधीतरी एकमेकांना लाथा मारणार, एकमेकांना “पहिला शत्रू’ म्हणणार… आणि एखाद्या क्षणी पुन्हा मिठी मारून मला चकित करण्याचा प्रयत्न करणार; परंतु मी चकित होतच नाही. त्यामुळं त्यांचे प्रयत्न व्यर्थ ठरतात. हेच पाहा ना, काही महिनेच झाले असतील. काही माणसं खिशात राजीनामा घेऊन फिरत होती. काही माणसं जाहीर मेळावे घेऊन “लग्न मोडलं… यापुढं एकट्याने प्रवास…’ अशा गर्जना करत होती. याउलट काहीजण असं म्हणणाऱ्या मुंबईकरांना मुंबईतच चितपट करण्याची भाषा करत होती. एकाएकी वातावरण कधी फिरलं हे आता मला आठवतसुद्धा नाही.

आता ते राजीनामे गेले, “आधी मंदिर मग सरकार’ या आरोळ्या गेल्या आणि मुंबईतलं कथित माफिया राजही अचानक संपुष्टात आलं. हे काही फक्त मुंबईत किंवा महाराष्ट्रातच घडलं असं नाही. उत्तर प्रदेशातसुद्धा बऱ्याच वर्षांपूर्वी एकमेकांपासून विलग झालेले एकत्र आले. काहीजण बंगालच्या घरात रोमान्स आणि केरळच्या घरात लाथाळ्या करताहेत. एवढं सगळं पाहून कुणाच्या संवेदना शिल्लक राहतील? माझ्याही संपल्या. मी जशी सुस्वरूप नाही, तशी फारशी कुरूपसुद्धा नाही. यांच्याइतकी तर नाहीच नाही. पण तरीसुद्धा मी कुणालाच आवडत नाही. महिलांच्या आरक्षणाचा मुद्दा सगळ्यांनीच आपापल्या जाहीरनाम्यात घेतलाय. पण आरक्षणाबरोबर संरक्षण कोण देणार, हे कुणीच सांगेना. जी आता घर सोडून काम करतेय, जीडीपीत भर घालते, तीच कामाच्या ठिकाणी शोषण सहन करतेय. तीच ऍसिड हल्ले आणि अत्याचारही सहन करतेय, हे यांना ठाऊक नाही की काय? राजधानी दिल्लीतल्या एका निर्भयानं काही वर्षांपूर्वी देश हादरवून सोडला.

जागोजागी मेणबत्त्या पेटल्या; पण त्या मेणबत्त्यांइतक्‍याच संख्येनं त्यानंतरही निर्भया निर्माण झाल्या, याचं कुणाला सोयरसुतक? माझ्याबद्दल, माझ्या घराबद्दल आज कुणीच काही बोलत नाही. पूर्वी चार दिवस का होईना, माझा विषय निघायचा. आता तोही बंद!

मी कुणाचीच मेहबूबा नाही. यापुढं बनू शकेन, असंही वाटत नाही. रोजगार नसताना सेन्सेक्‍सचा वाढणारा ग्राफ पाहात मी सुन्नपणे बसले आहे. मी सगळ्यांची असून कुणाचीच नाही. मला कुणी माझी जात सांगतं, कुणी माझा धर्म सांगतं, कुणी माझं कर्तव्य सांगतं, तर कुणी हक्क सांगतं. मी जगायचं कसं हे कुणीच सांगत नाही. मी नाही सेलिब्रिटी, मी नाही कुठल्या बड्या घराण्याची वारसदार. मी आहे या देशाची दुर्दैवी जनता!

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)