#दखल: मेघालय युग आणि बोध (भाग १)

श्रीनिवास औंधकर (खगोलशास्रज्ञ)  
सध्या सुरू असलेल्या 11700 वर्षांच्या युगाचा सर्वांत प्रारंभिक कालखंडाचा शोध शास्त्रज्ञांना नुकताच लागला असून, त्याला मेघालय युग असे नाव देण्यात आले आहे. हा कालखंड केवळ सोयीसाठी केलेला नसून, पृथ्वीवरील मोठ्या फेरबदलाचा साक्षीदार म्हणून हा कालखंड आपल्या इतिहासाला, संस्कृतीला, जीवनशैलीला कलाटणी देणारा ठरला आहे. अशा कालखंडाच्या प्रारंभाच्या खुणा भारतात सापडाव्यात आणि मेघालयाचे नाव या युगाला देण्यात यावे, हा भारताच्या दृष्टीने मोठाच गौरव आहे तसाच तो जबाबदारीचे भान देणाराही आहे. 
पृथ्वीला 4.6 अब्ज वर्षांचा इतिहास असून, तो अनेक कालखंडांमध्ये विभाजित करण्यात आलेला आहे. यातील प्रत्येक कालखंड महत्त्वाच्या भूशास्त्रीय आणि पर्यावरणीय घटनांवर आधारित आहे. खंडांचे विभाजन होणे, पर्यावरणात आमूलाग्र परिवर्तन आणि पृथ्वीवर एखाद्या खास प्रकारच्या प्राण्यांची किंवा वनस्पतींचीउत्पत्ती होणे, अशा या घटना आहेत. ज्या काळात आपण जगतो आहोत, ते युग होलोसीन युग म्हणून ओळखले जाते. या युगाला मागील 11 हजार 700 वर्षांचा इतिहास आहे. ज्यावेळी वातावरणात अचानक उष्णता निर्माण झाली आणि आपण हिमयुगातून बाहेर पडलो, तेव्हापासून हे युग सुरू होते. अर्थात इंटरनॅशनल कमिशन ऑफ स्टॅटिग्राफीच्या (आयसीएस) मते, होलोसीन युगाचेही विभाजन अनेक भागांत केले जाऊ शकते.
भूशास्त्रीय इतिहास आणि काळाचा अधिकाधिक तपशील संकलित करून ठेवण्याचे काम आयसीएस ही संस्था करते. या संस्थेने सध्याच्या युगाला अप्पर, मिडल आणि लोअर अशा तीन भागांत विभाजित करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. या तीन कालखंडांत इतिहासातील महत्त्वाच्या घटनांची नोंद झाली आहे.
यातील सर्वांत अलीकडचे युग म्हणजे मेघालय युग 4200 वर्षांपूर्वीपासून 1950 वर्षांपूर्वीपर्यंत मानले जाते. या कालखंडात जगभरात सर्वत्र अचानक प्रचंड मोठा दुष्काळ पडला होता आणि तापमानातही घट नोंदविण्यात आली होती. या कारणांमुळे जगभरातील सर्व संस्कृती लयाला गेल्या होत्या. तथापि, या युगाला मेघालय युग असे नाव का दिले गेले, हा प्रश्‍न पडणे स्वाभाविक आहे. वस्तुतः संशोधकांच्या एका आंतरराष्ट्रीय चमूने मेघालयातील एका गुहेच्या छतावरून फरशीवर सांडलेल्या चुन्याच्या ढिगाऱ्यातून स्टॅलॅगमाइट गोळा केले. यावरून शास्त्रज्ञांना पृथ्वीवर झालेल्या जलवायू परिवर्तनाच्या सर्वांत छोट्या घटनेची माहिती मिळाली. त्यावरूनच या युगाला मेघालयन एज म्हणजेच मेघालय युग असे नाव देण्यात आले.
या कालखंडाची सुरुवात भयंकर दुष्काळाने झाली होती. या दुष्काळाचा प्रभाव दोन शतकांपर्यंत कायम राहिला. शास्त्रज्ञांच्या मते, अंतिम हिमयुगाची सांगता झाल्यानंतर अनेक क्षेत्रांमध्ये विकसित झालेल्या कृषिआधारित समाजांवर या पर्यावरणीय घटनेचा गंभीर परिणाम झाला. परिणामी इजिप्त, यूनान, सीरिया, पॅलिस्टाइन, मेसापोटेमिया, सिंधू संस्कृती आणि यांग्त्से नदीखोऱ्यातील संस्कृतींवर प्रभाव पडला. मेघालय युगाला हे नाव ज्या मेघालयामुळे मिळाले, ते भारतातील अत्यंत महत्त्वाचे राज्य आहे. जगात सर्वाधिक पाऊस पडणारे चेरापुंजी हे ठिकाण मेघालयातच आहे. जग हे नाव विसरू शकत नाही, मग भारतीयांनी विसरण्याचा प्रश्‍नच येत नाही. मेघांचे छत्र सर्वाधिक लाभलेले राज्य म्हणूनच त्याला मेघालय म्हटले गेले आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)