#दखल: मेघालय युग आणि बोध (भाग २)

श्रीनिवास औंधकर (खगोलशास्रज्ञ)  
सध्या सुरू असलेल्या 11700 वर्षांच्या युगाचा सर्वांत प्रारंभिक कालखंडाचा शोध शास्त्रज्ञांना नुकताच लागला असून, त्याला मेघालय युग असे नाव देण्यात आले आहे. हा कालखंड केवळ सोयीसाठी केलेला नसून, पृथ्वीवरील मोठ्या फेरबदलाचा साक्षीदार म्हणून हा कालखंड आपल्या इतिहासाला, संस्कृतीला, जीवनशैलीला कलाटणी देणारा ठरला आहे. अशा कालखंडाच्या प्रारंभाच्या खुणा भारतात सापडाव्यात आणि मेघालयाचे नाव या युगाला देण्यात यावे, हा भारताच्या दृष्टीने मोठाच गौरव आहे तसाच तो जबाबदारीचे भान देणाराही आहे.
मेघालय या शब्दाचा अर्थ ढगांचे घर. परंतु आपल्याकडील एक अस्वस्थ करणारे वास्तव असे आहे की, जो इतिहास शाळांमधून शिकविला जातो, त्यात ईशान्येकडील राज्यांचा उल्लेख फारच कमी असतो. पाषाणयुगातील संस्कृतीचे सर्वांत जुने अवशेष मेघालय आणि आसपासच्या परिसरात आढळून येतात, एवढे मात्र जरूर शिकविले जाते. अर्थात, त्यानंतरच्या इतिहासात मेघालयाला फारसे स्थान दिले जात नाही. परंतु आपण जो इतिहास शिकतो किंवा शिकवतो, ऐकतो किंवा ऐकवतो, तो बराचसा मेघालयाशी संबंधित आहे, हे आता मात्र ठळकपणे पुढे आले आहे.
दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास हा इतिहास म्हणजे मेघालय युगाचाच एक छोटासा अंश आहे. म्हणजेच, ज्या मेघालयाला आपण आपल्या इतिहासात सर्वांत कमी जागा दिली आहे, त्या मेघालयानेच आपल्या इतिहासाला एवढी जागा दिली आहे की, आपला इतिहास तेवढ्या जागेत सामावूही शकत नाही.
आपण सध्या ज्या युगात राहत आहोत, तेच मेघालय युगानंतर अवतरलेले आहे आणि मेघालय युग 4200 वर्षांपूर्वी सुरू झालेले आहे, हे नवे वर्गीकरण आता जगभरातील शास्त्रज्ञांना मान्य आहे. पृथ्वीवरील ज्या खडकांच्या निर्मितीमुळे नव्या युगाला आरंभ झाला, त्या खडकाच्या निर्मितीची प्रक्रिया शास्त्रज्ञांना मेघालयात खोदलेल्या गुहांच्या खडकातच आढळून आली. या युगाला मेघालय युग असे नावही भारताने दिलेले नाही, तर आयसीएसने दिले आहे. याचाच अर्थ असा की, आपल्या संपूर्ण विश्‍वाचा इतिहास हा मेघालय युगाचा एक हिस्सा आहे. हा असा इतिहास आहे, ज्याचा अभिमान आपण बाळगला पाहिजे.
आपले पूर्वज म्हणजे आदीमानव सुमारे एक लाख वर्षांपूर्वी या धरतीवर अवतरले होते, असे मानले जाते. परंतु गेल्या 4200 वर्षांचा इतिहास आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा इतिहास आहे. कारण जवळजवळ याच कालावधीत विविध मानवी संस्कृती अस्तित्वात आल्या आहेत आणि या संस्कृती उत्तरोत्तर प्रगत होत गेल्या आहेत. निसर्गाबरोबर साहचर्य राखून मानवाने एक नवी दुनिया वसवली, ती याच कालावधीत. निसर्गापासून ज्या वस्तू मिळत गेल्या, त्या आपल्या गरजेप्रमाणे वेगवेगळ्या स्वरूपांत परावर्तित करून मानवाने इतिहास पुढे नेला.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)