तयारीला लागा ! एस.टी महामंडळाची ‘मेगा भरती’

चालक वाहकांची ४२४२ पदे भरणार – दिवाकर रावते 

मुंबई: राज्यात दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या १५ जिल्ह्यांमधील युवक-युवतींसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने चालक तथा वाहक पदाच्या ४ हजार २४२ पदांची भरती करण्यात येणार असून यासंबंधीची जाहिरात महामंडळाच्या वतीने लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल तसेच औरंगाबाद स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी ५६० पदे एस.टी महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने भरण्यात येतील अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दिवाकर रावते म्हणाले, राज्यात दुष्काळाच्या झळांनी त्रस्त असलेल्या दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एस.टी महामंडळाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. यावर्षी दुष्काळग्रस्त जाहीर झालेल्या १५ जिल्ह्यांमधील युवकांच्या हाताला काम मिळावे, त्यांना रोजगार मिळावा  या हेतूने एस.टी महामंडळाने दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील युवकांना चालक तथा वाहकपदाची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना एस.टीचा मोफत  प्रवास पास देण्याचा निर्णयही एस.टी महामंडळाने यापूर्वीच घेतला आहे.


दुष्काळग्रस्त जिल्हे आणि रिक्त पदे

दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची माहिती देताना ते पुढे म्हणाले, ही भरती      औरंगाबाद,बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, अमरावती, अकोला,बुलढाणा, यवतमाळ, धुळे, जळगाव, नाशिक आणि पुणे या पंधरा जिल्ह्यात होईल. परंतु यापैकी ११ जिल्ह्यात ४ हजार २४२ पदांच्या जागा आहेत. बीड,लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड या जिल्ह्यात चालक तथा वाहक पदांच्या रिक्त जागा नाहीत. असे असले तरी या चार दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील युवकांच्या हाताला काम देण्यासाठी या जिल्ह्यातील पात्र उमेदवारांची निवड करण्यात येऊन त्यांना ज्या जिल्ह्यांमध्ये जागा रिक्त आहेत तिथे नियुक्त्या दिल्या जातील. तसेच ज्यावेळी या चार जिल्ह्यात चालक तथा वाहक पदाच्या जागा रिक्त होतील तेव्हा या उमेदवारांना पुन्हा त्यांच्या जिल्ह्यात नियुक्ती देण्यात येईल.

त्या त्या जिल्ह्यात एकाच दिवशी चालक तथा वाहक पदाच्या परीक्षा घेतल्या जातील, बीड, लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यातील युवक उर्वरित ११ ठिकाणी कुठेही एका ठिकाणी परीक्षेस उपस्थित राहू शकतील. या भरतीशिवाय उर्वरित जिल्ह्यांमधील रिक्त पदांचा आढावा घेऊन भरती प्रक्रिया लवकरच राबविली जाईल असेही ते म्हणाले.


मराठा आरक्षणाची अंमलबजावणी
या भरतीमध्ये इतर आरक्षणाबरोबर मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय ही एस.टी महामंडळाने घेतला आहे.


परीक्षा शुल्कात सवलत
ही भरती दुष्काळग्रस्त भागासाठी असून या पदांसाठी अर्ज करणाऱ्या मागासवर्गीय तसेच दुष्काळग्रस्त उमेदवारांना या पदांच्या परीक्षा शुल्कात ५० टक्क्यांची सवलत देण्यात येणार आहे.


औरंगाबाद स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत काम करण्याचा विकल्प
परीक्षेत उत्तीण उमेदवारांना या व्यतिरिक्त औरंगाबाद स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत राबवावयाच्या शहर वाहतूक योजनेसाठी १५ हजार रुपयांच्या ठोक रकमेवर कंत्राटी पद्धतीने काम करण्याचा विकल्पही स्वीकारता येईल, अशी माहितीही दिवाकर रावते यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)