परवडण्याजोगे अौषधोपचार (भाग 2)

-प्रा.बेजाॅनकुमार मिश्रा

भारतातील आरोग्यसेवा विभाग सध्या निर्णायक परिस्थितीतून जात आहे. देशातील दरडोई आरोग्यसेवा खर्च केवळ 75 डॉलर्स आहे. चीनमध्ये हा खर्च 420 डॉलर्स आहे, तर जागतिक सरासरी 948 डॉलर्स आहे. भारतात या किरकोळ खर्चातील 62 टक्‍के खर्च रुग्णाला त्याच्या खिशातून करावा लागतो. (चीनमध्ये हे प्रमाण 32 टक्‍के आहे).

-Ads-

पण हे बदलत आहे

खात्रीशीर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार याबाबत नवीन दृष्टिकोन ठेवून नीती आयोगाच्या टीएमआर मोजणीच्या सूत्राचा अवलंब करण्याच्या विचारात आहे. यामुळे, पहिल्या विक्रीबिंदूला (स्टॉकिस्ट) असलेल्या किमतीत ट्रेड मार्जिनची भर घातली जाईल आणि उपकरणाची कमाल किरकोळ किंमत अर्थात एमआरपी निश्‍चित केली जाईल. रुग्णाच्या प्राधान्यावर व आर्थिक क्षमतेवर आधारित असे पूर्णपणे स्पर्धात्मक असे वातावरण निर्माण केले जाईल.

याचा रुग्णाला फायदा कसा होईल?

दर्जेदार आरोग्यसेवेसाठी सातत्याने नवकल्पना येणे आवश्‍यक आहे. आणि नवकल्पनांसाठी गुंतवणुकीची गरज भासते. देशातील आरोग्यसेवेवर केला जाणारा किरकोळ खर्च बघता, रुग्णांना दर्जेदार उपचार मिळत आहेत याची खातरजमा सरकार कशी करणार?

जलद बरे होणे, आजार पुन्हा न उद्भवणे, उपचार पूर्ण झाल्यानंतर लांबलचक फॉलो-अप्स न घ्यावे लागणे आणि परवडण्याजोग्या दरातील उपचार हे मुद्दे रुग्णाच्या लेखी महत्त्वाचे असतात. आणि वैद्यकीय उपकरणांची प्रगत तंत्रज्ञानावर आधारित प्रारूपे या रुग्णाच्या या सर्व चिंता मिटवणारी आहेत. संशोधनावर आधारित संस्था व कंपन्यांनी भारतात व्यवसाय करत राहावे म्हणून तसेच त्यांना उत्तेजन देण्यासाठी त्यांच्या गुंतवणुकीला देशांतर्गत तसेच परदेशी उद्योजकांकडून योग्य परतावा मिळावा एवढी संवेदनशीलता दाखवली जाणे आवश्‍यक आहे.

टीएमआर नवकल्पनांना धरून ठेवण्यात मदत करणार आहे. त्यामुळे रुग्णांना उच्च दर्जाची उपकरणे उपलब्ध होतील. संशोधन, इन-क्‍लिनिक सपोर्ट, क्‍लिनिशिअन्समधील कौशल्य विकास आणि उपचार जागरूकता कार्यक्रम अशा उपक्रमांना टीएमआर पाठबळ देईल. राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना (एनएचपीएस) आणि आरोग्य केंद्रांसारख्या मोठ्या प्रमाणावरील आरोग्यसेवा कार्यक्रमांच्या यशासाठी हे उपक्रम आवश्‍यक आहेत.

वैद्यकीय उपकरणांच्या ट्रेड मार्जिनमध्ये तर्कसंगती आणण्यासाठी संशोधनाधारित संस्था आणि व्यवसायांच्या शिफारसी विचारात घेतल्यास, कोणते उपकरण वापरायचे याबाबत अंतिम निर्णय घेण्याचा हक्‍क क्‍लिनिशिअन्स आणि रुग्णांना मिळेल. भारतात पूर्वीच्या सरकारांच्या कार्यकाळात प्रस्थापित असलेल्या इन्स्पेक्‍टर राजहून ही परिस्थिती वेगळी असेल. या इन्स्पेक्‍टर राजमध्ये स्पर्धात्मक वातावरणात सर्वोत्तम व्यावसायिक पद्धतींवर आधारित खुल्या, पारदर्शक आणि कार्यक्षम प्रशासनाला बढावा दिला जात नव्हता.

परवडण्याजोगे अौषधोपचार (भाग 1)  परवडण्याजोगे अौषधोपचार (भाग 3)

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)