परवडण्याजोगे अौषधोपचार (भाग 1)

-प्रा.बेजाॅनकुमार मिश्रा

भारतातील आरोग्यसेवा विभाग सध्या निर्णायक परिस्थितीतून जात आहे. देशातील दरडोई आरोग्यसेवा खर्च केवळ 75 डॉलर्स आहे. चीनमध्ये हा खर्च 420 डॉलर्स आहे, तर जागतिक सरासरी 948 डॉलर्स आहे. भारतात या किरकोळ खर्चातील 62 टक्‍के खर्च रुग्णाला त्याच्या खिशातून करावा लागतो. (चीनमध्ये हे प्रमाण 32 टक्‍के आहे).

वरकरणी, वैद्यकीय उत्पादनांच्या दरावर मर्यादा घालत आरोग्यसेवा परवडण्याजोग्या करून खर्चातील कमतरता भरून काढली जाणे अपेक्षित होते. मात्र, हा उपाय पूर्णपणे अपयशी ठरला आहे. अर्थात, सरकारला टीएमआरच्या रूपाने एक उपाय सापडल्यासारखा दिसत आहे. मात्र हा उपाय रुग्णाच्या गरजा केंद्रस्थानी ठेवून योग्य पद्धतीने वापरला तरच उपयुक्त ठरेल.

वैद्यकीय उपकरणांच्या ट्रेड मार्जिनवर 65 टक्‍के ही मर्यादा घालण्याची नीती आयोगाची शिफारस अमलात आणण्याकडे सरकारचा कल आहे. हा निर्णय सर्व प्रक्रियांची गतीच बदलून टाकेल. देशात सध्याच्या शोधांवर आधारित नवकल्पना, दर्जा व परवडण्याजोग्या आरोग्यसेवेची उपलब्धता यांतील आव्हानांवर मात करणे यामुळे सुलभ होईल. त्याचप्रमाणे शास्त्रज्ञांना संशोधन व विकासात अधिक गुंतवणूक करण्याची संधी मिळेल.

गोष्टी दृष्टिकोनाच्या टप्प्यात आणणे

बदलत्या जीवनशैली अनेक जुनाट आजारांच्या वाढीसाठी सुपीक जमीन ठरत आहेत. या विकारांच्या प्रमाणात प्रचंड वेगाने वाढत होत आहे. त्याचप्रमाणे त्यांच्यावर उपाय करणाऱ्या वैद्यकीय तंत्रज्ञानाचीही जलद वाढ होत आहे. आज, किमान इन्व्हेजिव शस्त्रक्रियांना रुग्णांची पसंती आहे. गुंतागुंत टाळण्यासाठी ओपन शस्त्रक्रियांचा पर्याय सहसा स्वीकारला जात नाही. ट्रान्स कॅथर शस्त्रक्रिया आणि की-होल शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढले आहे. त्याचप्रमाणे आधुनिक वैशिष्ट्‌ये असलेल्या दीर्घकालीन व शाश्‍वत इम्प्लांट्‌संनाही भारतातील रुग्ण मोठ्या संख्येने पसंती देऊ लागले आहेत.

इम्प्लांट्‌समुळे शस्त्रक्रियेनंतरच्या औषधांचे व नियमित फॉलो-अप्सचे प्रमाणही कमी होते. मेकॅनिकल इम्प्लांट्‌सची जागा जीवशास्त्रीय इम्प्लांट्‌स घेऊ लागले आहेत हे याचे उत्तम उदाहरण. रुग्णाच्या शस्त्रक्रियेपूर्वीच्या, शस्त्रक्रियेच्या वेळच्या आणि शस्त्रक्रियेनंतरच्या अवस्थेचा अंदाज बांधणाऱ्या उपकरणांमुळे क्‍लिनिशिअन्सना खूपच मदत होत आहे.

हेमोडायनॅमिक मॉनिटरिंगसारख्या सोयींमुळे महत्त्वाच्या मापदंडांनुसार रुग्णाची प्रक्रियेपूर्वीची, प्रक्रिया सुरू असतानाची आणि प्रक्रिया पार पडल्यानंतरची स्थिती समजून घेता येते. त्यामुळे रुग्णाला आयसीयूतून लवकर हलवता येते तसेच तो कोणतीही गुंतागुंत किंवा चूक न होता लवकर बरा होऊ शकतो. ही सर्व तंत्रज्ञाने आपल्या रुग्णांना मदत करण्यासाठी हवी असतील, तर त्यांच्या विकासासाठी अनुकूल वातावरण आवश्‍यक आहे. त्यांचा विकास नैतिक मार्गांनी दर्जा व सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड न करता झाला पाहिजे.

यात टीएमआरची भूमिका काय?

ट्रेड मार्जिन रॅशनलायझेशन अर्थात टीएमआरमुळे उत्पादनांच्या दरांमध्ये बाजारपेठेच्या आधारावर फरक निश्‍चित केला जाऊ शकतो. त्याचवेळी कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत यासाठी मागणीवर आधारित दरवाढीवर (मार्क-अप्स) टीएमआर नियंत्रण ठेवते. मात्र, सध्याच्या एमआरपी दर नियंत्रणामध्ये, सरासरी आयात खर्चावरील मार्क-अपमुळे अधिक अद्ययावत तंत्रज्ञानासाठी भिन्न दर लावून रुग्णाला निवडीची संधी दिली जाऊ शकत नाही.

त्यामुळे भारतीय रुग्णांना उपलब्ध होऊ शकतील अशी आधुनिक व प्रगत वैद्यकीय उपकरण तंत्रज्ञाने त्यांना मिळू शकत नाहीत. नफ्यावरील मर्यादा आयात खर्चाच्या टप्प्यापासून लागू केली तर भारतात कल्पक तंत्रज्ञानाच्या प्रवेशालाच फटका बसेल असा इशारा तज्ज्ञांनी पूर्वीच दिलेला होता. यामुळे वैद्यकीय उपकरणांचे दर 73 टक्‍क्‍यांनी कमी होतील असा अंदाज होता.

परवडण्याजोगे अौषधोपचार (भाग 2)  परवडण्याजोगे अौषधोपचार (भाग 3)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)