मेडिकल कॉलेजचा अहवाल सादर 

नियोजित वैद्यकीय महाविद्यालय : संपूर्ण प्रक्रिया होण्यास ऑगस्ट उजाडणार

नायडू हॉस्पिटलच्या जागेची चर्चा

वैद्यकीय महाविद्यालयासाठी साडेदहा एकर जागेची आवश्‍यकता आहे. महापालिकेकडे पुणे रेल्वे स्थानकाजवळील नायडू हॉस्पिटल येथे साडेबारा एकर जागा उपलब्ध आहे. या जागेवर महापालिकेच्या अनेक जुन्या, नव्या इमारती आहेत. त्यातील जुन्या इमारती पाडून त्या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्‍यक असलेल्या इमारती बांधण्याचे आणि अस्तित्वात असलेल्या नव्या इमारतीचा पुनर्वापर करण्याचे नियोजन केले जात आहे. तसेच या जागेवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचेही स्थलांतर केले जाण्याची शक्‍यता आहे.

पुणे – महापालिकेच्या नियोजित वैद्यकीय महाविद्यालया बाबतचा सल्लागाराने तयार केलेला अहवाल आयुक्त सौरभ राव यांना शुक्रवारी सादर करण्यात आला आहे. महापालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय असावे यासाठी काही वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. स्थायी समिती अध्यक्षांनीही यासाठी तरतूद केली आहे. मात्र त्या तरतुदीचे प्रत्येकवेळी वर्गीकरण करण्यात आले. आता हा विषय प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी गांभीर्याने घेतला असून, त्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

यासाठी महापालिकेने तज्ज्ञ सल्लागाराची नेमणूक केली होती. महापालिकेकडे उपलब्ध असणाऱ्या साधनांचा तज्ज्ञ सल्लागारांकडून अभ्यास करण्यात आला असून, त्या आधारावर अहवाल तयार करून तो आयुक्तांना सादर करण्यात आला आहे. घोले रस्ता येथे बैठकीत “इंडियन मेडिकल कौन्सिल’च्या कमिटी सदस्यांसमोर सल्लागार कंपनीच्या प्रतिनिधींनी याचे सादरीकरण केले. त्यामध्ये आर्थिक बाजू आणि अन्य गोष्टींचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र यामध्ये महापालिका आयुक्तांनी काही सूचना केल्या आहेत. त्यामध्ये गुजरात, बारामती आणि अन्य काही ठिकाणच्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या कार्यक्षेत्राची माहिती घेऊन त्यानुसार अहवालात काही गोष्टींचा समावेश करावा, असे सुचवले आहे.

या सगळ्या गोष्टींचा समावेश करून आठ दिवसांत पुन्हा याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर हे सादरीकरण महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, आणि अन्य पदाधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात येईल. त्यांनी सुचवलेले बदल वगैरेंचा समावेश करून स्थायी समितीच्या मंजुरीने हा प्रस्ताव नाशिक येथील आयुर्विज्ञान संस्थेमार्फत राज्यसरकारकडे सादर केला जाईल. या सगळ्या प्रक्रियेला ऑगस्ट उजाडणार असल्याची माहिती महापालिकेतील आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिली. एखादे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावयाचे असल्याच 12 प्रकारच्या परवानग्या आवश्‍यक आहेत. सध्या हा प्रकल्प प्राथमिक स्तरावर आहे.महाविद्यालय सुरु करावयाचे असल्यास नॅशनल मेडिकल कौन्सिलची मान्यता आवश्‍यक असते. त्यांच्या नियमाप्रमाणे सर्व सोयी-सुविधा असणे आवश्‍यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)