मांसाहार आणि वजन 

डॉ. तेजस प्रज्ञा यशवंत लिमये 

जन आटोक्‍यात ठेवण्यासाठी आहारात फळे व भाज्यांचे प्रमाण किती असावे याबद्दल मी रसिकाशी बोलले. फळे – भाज्यांचा केव्हा आणि कशा प्रकारे आहारात समावेश करावा, काय काळजी घ्यावी याबाबत आम्ही बरीच चर्चा केली. आता रसिकाने तिचा मोर्चा मांसाहारी पदार्थांकडे वळवला!

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नॉनव्हेजबद्दल तुझे काय मत आहे? मला अंडी, चिकन, मासे खूप आवडतात. आठवड्यातून 2-3 वेळा तरी होते खाणे. कधी घरी, कधी बाहेर. काही जण म्हणतात वजन कमी करण्यासाठी शाकाहार चांगला; तर काही जण फक्‍त अंडी, मासे चिकन खाऊन वजन कमी करतात! असे कसे? रसिकाने विचारले.

हे बघ, शाकाहार आणि मांसाहाराचे वेगवेगळे फायदे-तोटे आहेत. शाकाहारातून वेगवेगळी जीवनसत्वे (क जीवनसत्व, फोलिक ऍसिड), खनिजद्रव्ये, तंतूमय पदार्थ मिळतात पण वनस्पतीजन्य पदार्थांमधील प्रथिनांची, लोहाची गुणवत्ता कमी असते. यातून शरीरात रक्तक्षयासारख्या काही कमतरता दिसू शकतात. शुद्ध शाकाहारातून अतिरिक्‍त प्रमाणात कर्बोदके सेवन केली जाऊ शकतात. मी.

मांसाहारातून उच्चप्रतीची प्रथिने, उच्च प्रतीचे लोह आणि उच्चप्रतीची ओमेगा-3 मेदाम्ले मिळतात. जीवनसत्व ड, जीवनसत्व ब-12 यासारखी शुद्ध शाकाहारातून न मिळणारी जीवनसत्वे केवळ प्राणिजन्य पदार्थांमधून म्हणजेच मांसाहारातून मिळतात. त्यामुळे शरीरातील स्नायूंचे प्रमाण वाढवण्यासाठी, स्नायूंच्या ताकदीसाठी, रक्‍तातील हिमोग्लोबिन चांगले ठेवण्यासाठी, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मांसाहाराची मदत होते. याउलट मांसाहारातून संपृक्‍त प्रकारचे स्निग्ध पदार्थ पोटात जातात, मांसाहारी पदार्थांमध्ये तंतूमय पदार्थांचे प्रमाण कमी असते. त्यामुळे मांसाहारी व्यक्तींमध्ये हृदयविकार, उच्च रक्‍तदाब व काही प्रकारच्या कर्करोगांचे प्रमाण शाकाहारींपेक्षा जास्त असते असे दिसून आले आहे. मांसाहारी पदार्थ बनविण्याची पद्धतसुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. तू कसे बनवतेस मांसाहारी पदार्थ? मी विचारले.

मासे केले तर तळूनच करते आणि चिकन कधीतरी तळून, ग्रील करून नाहीतर रस्सा करून खाते. रसिका.
रस्सा केला तर त्यात काय काय असते? मी.
रश्‍शात खोबरे-काजू-कांदा यांचे वाटण… रसिका.
आणि भरपूर तेल! मी रसिकाचे वाक्‍य पूर्ण केले.

हो, तर! तेल जास्त लागतेच चिकनचा रस्सा करायला. त्याशिवाय चांगले लागतच नाही चिकन! अशी छान तर्री यावी लागते वर! शिवाय कधी कधी बटर चिकन करताना त्यात बटरसुद्धा घालते! रसिका हसत म्हणाली.
बघ म्हणजे मूळातच मांसाहारी पदार्थांमध्ये स्निग्ध पदार्थांचे (फॅट्‌सचे) प्रमाण जास्त, आणि त्यात तू अजून भरभरून तेल / बटर (फॅट्‌स) घालतेस. यामुळे वजन तर वाढणारच; शिवाय मांसाहारी पदार्थांचे फायदेही मिळणार नाहीत. मी.
फायदे का मिळणार नाहीत?

तू जर मासा तळून खाल्लास, तर त्यातील उपयुक्‍त ड जीवनसत्व आणि ओमेगा 3 मेदाम्ले नष्ट होतात. शिवाय मासे अथवा चिकन तळताना अथवा ग्रिल करताना अतिशय उच्च तापमान असते. इतक्‍या जास्त तापमानाला त्यातील प्रथिनांच्या संरचनेमध्ये बदल घडून येतात (डिनॅचरेशन), त्यात काही हानिकारक घटक तयार होतात (उदा. हेटीरोसायक्‍लिक अमाईन्स). त्यामुळे अशा प्रकारे बनविलेले मांसाहारी पदार्थ खाऊन फायदा कमी आणि तोटाच जास्त होऊ शकतो. मी स्पष्ट केले.

मग मांसाहारी पदार्थ खायचे तरी कसे? रसिकाने गोंधळून विचारले.
अंडी उकडून/पाण्यात शिजवून (पोचिंग)/थोड्या तेलात भुर्जी/ऑमलेट करून खाणे चांगले. मासा/चिकन खायचे असल्यास उकडून/रस्सा करून खाणे चांगले. रस्सा करताना मात्र कमीत कमी तेल व तिखटाचा वापर करायचा. सुके खोबरे, काजू याऐवजी थोड्या प्रमाणात ओले खोबरे, मगज बी वापरायला हरकत नाही. बाकी कांदा-आलं-लसूण-टोमॅटो नेहमीप्रमाणे वापरून चालेल. तळणे मात्र पूर्णपणे टाळायचे. मटण, खेकडे टाळलेलेच चांगले. मी.
बरं… आणि अंडी खाताना त्याचा बलक (पिवळा भाग) खायचा नाही ना? त्यात कोलेस्टेरॉल असते म्हणे. रसिकाने नेहमीचा प्रश्न विचारला.

अंड्याच्या पिवळ्या भागात कोलेस्टेरॉल असते, हे खरेच आहे, पण अंड्यातली सगळी जीवनसत्वेही अंड्याच्या पिवळ्या भागातच एकवटलेली असतात. पांढऱ्या भागात फक्त प्रथिने असतात. त्यामुळे दररोज एका अंड्याचा पिवळा भाग आहारात घ्यायला हरकत नाही. एका अंड्यात असलेले कोलेस्टेरॉल दररोज पोटात जाऊन चालते. मी सांगितले.
वजन कमी करायचे असले तरीही? रसिकाने पुन्हा खात्री करण्यासाठी विचारले.

हो. अंड्याचा फक्त पांढरा भाग खाऊन पोट भरत नाही व लगेच भूक लागते. याउलट संपूर्ण अंडे खाल्यास बराच वेळ पोट भरलेले रहाते. काही जण अंड्याच्या पांढऱ्या भागाचे ऑमलेट ब्रेडबरोबर खातात. त्यापेक्षा ब्रेड वगळून संपूर्ण अंडे खाणे कधीही श्रेयस्कर! मी तिला समजावले.

तू सांगतेस त्या प्रकारे केलेले मांसाहारी पदार्थ किती वेळा खाल्लेले चांगले? रसिकाने विचारले.
अंडे दररोज एखादे खाऊनही चालेल. चिकन/ मासा आठवड्यातून एकदा किंवा दोनदा खायला हरकत नाही. मी.
हो. आमच्याकडे सोमवार, गुरुवार आणि शनिवार नॉनव्हेज केलेले चालतच नाही. देवांचे वार असतात ना? रसिका.
देवांचे वार असतात का नाही, हा ज्याचा-त्याचा श्रद्धेचा प्रश्न आहे, पण त्यानिमित्ताने का होईना, नॉनव्हेजचा अतिरेक होत नाही हे चांगलेच म्हणायचे! मी.

अजून एक गोष्ट, नॉनव्हेजबरोबर – विशेषतः रस्सा केला असताना बऱ्याचदा पोळी/भाकरी/भात जास्त प्रमाणात खाल्ला जातो. यामुळेही वजन वाढू शकते. असे होते का तुझ्या बाबतीत? मी पुढे विचारले.
हो, अगदी खरंय. जरा जास्तच जेवण जाते अशावेळी! मग तासभर तरी डुलकी काढावीच लागते जेवणानंतर! रसिकाने नॉनव्हेज खाऊन वजन वाढण्याचे पुढचेही कारण सांगितले!!

मग काही लोक भरपूर नॉनव्हेज खाऊनदेखील वजन कसे कमी करतात? रसिका.
वजन कमी करण्याच्या वेगवेगळ्या आहारपद्धती असतात. काही पद्धतींमध्ये योग्य प्रकारे बनविलेले नॉनव्हेज पदार्थ बऱ्याच प्रमाणात घेतात पण त्याबरोबर फक्त भाज्या, सॅलड्‌स खातात. धान्ये, गोड पदार्थ पूर्ण वर्ज्य करतात. त्याबरोबर दणकून व्यायमही करतात! सहाजिकच वजन कमी होते. मी.

हं… पण काही जण विशेषतः अनेक सेलेब्रिटीज शुद्ध शाकाहारी राहून वजन कमी केल्याचे सांगतात. त्यामुळे वजन कमी करायला शाकाहारच बरा असे कधीकधी वाटायला लागते! रसिका म्हणाली.
मला एक गोष्ट सांग – बटाट्याचे वेफर्स, मिठाया, शीतपेये यासारखे पदार्थ शाकाहारातच येतात ना? मग असा शाकाहार घेऊन वजन कमी होईल का? मी.
कसं शक्‍य आहे? रसिका.

म्हणजेच शाकाहार जरी घ्यायचा झाला तरी तो तारतम्य वापरूनच घ्यावा लागतो! एक लक्षात ठेव – आहार कोणत्याही प्रकारचा असो – शाकाहार किंवा मांसाहार – त्याचे योग्य प्रकारे नियोजन केले, अन्नपदार्थ आरोग्यदायी पद्धतीने शिजवले आणि कोणत्याही पदार्थाचा अतिरेक टाळला तर वजन कमी करणे मुळीच अवघड नाही. मी म्हणाले.
आले लक्षात. दुधाबद्दल काही बोललो नाही आपण. वजन कमी करायला गाईचे दूध चांगले की म्हशीचे? आणि ए वन , ए टू दूध म्हणतात ते काय असते? रसिकाचा पुढचा प्रश्‍न तयारच होता!

(क्रमश:) 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)