नवी दिल्ली – बसपा प्रमुख मायावती यांचे भाऊ आणि त्यांच्या पत्नीशी संबंधित असलेली सुमारे 400 कोटी रुपये किंमतीची बेनामी मालमत्ता प्राप्तीकर विभागाने जप्त केली आहे. या मालमत्तेमध्ये नोएडा जवळील व्यवसायिक भूखंडाचा समावेश आहे. प्राप्तीकर विभागाने प्रतिबंधात्मक जप्ती केलेल्या या 7 एकराच्या भूखंडाचे लाभार्थी मालक आनंद कुमार आणि त्यांच्या पत्नी विचटर लता यांच्याकडे आहे. दिल्लीतल्या बेनामी विरोधी विभागाकडून 16 जुलैरोजी हे प्रतिबंधात्मक जप्तीचे आदेश जारी केले.
मायावती यांनी अलिकडेच बंधू आनंद कुमार यांना बहुजन समाज पार्टीचे राष्ट्रीय उपाध्य नियुक्त केले आहे. नोएडात गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातल्या 2 ए, सेक्टर 94 या बेनामी भूखंडावर एक पंचतारंकित हॉटेल आणि अन्य लक्झरी सुविधा केंद्र उभारण्याचे नियोजन होते. या भूखंडाची बाजारभावाने किंमत 400 कोटी रुपये अहे, असेही प्राप्तीकर विभागाच्या प्रतिबंधात्मक आदेशांमध्ये म्हटले आहे.
प्राप्तीकर विभागाच्या तपासणीमध्ये या प्रकरणात किमान 6 कंपन्य सह्भागी असल्याचे निदर्शनास आले. त्यातील काही “बेनामीदार’ कंपन्या बनावट आहेत. आनंद कुमार आणि विचटर लता हे दोघेही बहुस्तरिय बेनामी व्यवहारातील एकमात्र लाभार्थी आहेत. त्यांनीच या कंपन्यांच्या माध्यमातून हे व्यवहार केले आहेत, असा आरोप प्राप्तीकर विभागने केल आहे.