मावळसाठी 1486 तर शिरुरसाठी 2755 मतदान यंत्रे

संग्रहित छायाचित्र.......

मतदारसंघ निहाय वाटप ः सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे मशीन सोपविल्या

पिंपरी -लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरीक मावळ आणि शिरुर या दोन लोकसभा मतदार संघांसाठी मतदान करतात. या दोन्ही मतदार संघांमध्ये 29 एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे. निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनचे वाटप करण्यात आले आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय याचे वाटप करण्यात आले असून सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे या मशीन सोपविण्यात आल्या आहेत. मावळ लोकसभा मतदार संघासाठी एकूण 1486 तर शिरुरसाठी 2 हजार 755 ईव्हीएम मशीन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीत यंदा इव्हीएम मशीनसोबत व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रायल) वापरले जाणार आहे. या सुविधेमुळे मतदाराला आपले मत कोणाला दिले हे प्रिंट स्वरुपात दिसणार आहे. जिल्ह्यातील मावळ, पुणे, बारामती आणि शिरूर या चार लोकसभा मतदारसंघासाठी जिल्हा प्रशासनाकडून इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनचे वाटप करण्यात आले आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय याचे वाटप करण्यात आले असून सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे या मशीन सोपविण्यात आल्या आहेत.

निवडणूक प्रक्रिया अधिक पारर्शक करण्यासाठी निवडणूक आयोगाने पावले उचलली आहेत. निवडणूक पूर्णपणे पारदर्शी करण्यासाठी निवडणूक आयोगाने सुरुवातीला इव्हीएम वापरण्यास प्रारंभ केला होता. यानंतर, इव्हीएमसोबत व्हीव्हीपीएटी जोडले जाणार आहे. निवडणूक आयोगाने सर्व जिल्ह्यांना नवीन इव्हीएम मशीन (बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट) आणि व्हीव्हीपीएटी मशीन दिले आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्यासाठी 16 हजार 927 बॅलेट युनिट, 9 हजार 870 कंट्रोल युनिट आणि 11 हजार 81 व्हीव्हीपॅट मशीन दिले आहेत. जिल्ह्यात एकूण 7 हजार 903 मतदान केंद्रे आहेत.

प्रत्येक मतदान केंद्रावर आता इव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट मशीन असणार आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने इव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीनची सर्व तपासणी यापूर्वीच पूर्ण केली आहे. जिल्हा प्रशासनाने मंगळवारी विधानसभा मतदारसंघ निहाय या मशीनचे वाटप सुरू केले आहे. विधानसभा मतदारसंघातील सहायक निवडणूक यांच्या ताब्यात या मशीन देण्यात आल्या आहेत. ऐनवेळी काही मशीनमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाल्यास अतिरिक्त मशीनची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानुसार जादाच्या मशीनही निवडणूक अधिकाऱ्यांकडे देण्यात आल्या असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

 

अशी असेल व्यवस्था
मावळ आणि शिरुर या दोन लोकसभा मतदार संघांमध्ये निवडणूक तयारींना वेग आला आहे. मावळमध्ये 1 हजार 236 एकूण मतदान केंद्र असणार आहेत. तर 1 हजार 486 इव्हीएम मशीनद्वारे मतदान आपल्या मताधिकाराचा उपयोग करतील. व्हीव्हीपॅट मशीनची संख्या 1 हजार 659 इतकी असणार आहे. दुसरीकडे शिरुर लोकसभा मतदार संघामध्ये 2 हजार 296 मतदान केंद्रे असणार आहेत. 2 हजार 755 इव्हीएम आणि 3 हजार 77 व्हीव्हीपॅट मशीनद्वारे मतदारांना मतदान करता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)