लोकसभेसाठी विलास लांडे-महेश लांडगेंचे ‘पॅचअप’?

नाती-गोती कायम राहतात : सूचक वक्‍तव्यामुळे गुपित उघड

“घर वापसीवाल्यां’चे स्थान आमच्या मागे!

राष्ट्रवादीतून दुसऱ्या राजकीय पक्षात गेलेल्यांची अवस्था अवघडल्यासारखी झाली आहे, अशी आम्हाला बाहेरून माहिती मिळाली आहे. शेवटी स्वत:चे घर ते स्वत:चे असते. इतरांच्या घरात पाहुण्यासारखे रहावे लागते, त्यामुळे अनेकजण आता राष्ट्रवादीत घरवापसीच्या तयारीत असल्याची माहिती शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी दिली. मात्र, घरवापसीनंतर त्यांचे स्थान आमच्या मागे असणार आहे, असे सांगत निष्ठावतांचा राष्ट्रवादीत योग्य सन्मान राखला जाईल, असे सूचक विधान त्यांनी केले.

पिंपरी – भोसरीचे भाजप सहयोगी आमदार महेश लांडगे यांनी विलास लांडे आणि आम्ही नातेवाईक असल्याचे सांगत त्यांच्यातील राजकीय वादावर पडदा टाकला होता. यावर विलास लांडे यांनी देखील राजकारण आज आहे उद्या नाही. नाती-गोती मात्र कायम असतात. ती पाळावी लागतात. त्यांनी घेतलेली भूमिका चांगली आहे. त्यामुळे चांगलेच होईल, असे वक्तव्य केल्याने या मामा-भाच्यामध्ये राजकीय “पॅचअप’वर शिक्‍कामोर्तब झाल्याचे सध्या तरी चित्र दिसत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्रेची माहिती देण्यासाठी बुधवारी (दि. 30) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत लांडे बोलत होते. राष्ट्रवादीची “निर्धार परिवर्तन यात्रा’ येत्या शनिवारी शहरात येत आहे. त्यानिमित्त शिरूर आणि मावळ लोकसभेच्या शक्‍तीप्रदर्शनाची राष्ट्रवादीने जोरदार तयारी केली आहे. शिरुर लोकसभेतील परिवर्तनासाठी राष्ट्रवादीने सर्वांनाच कामाला लागायाचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मी देखील काम सुरु केले आहे, असे सूचक वक्‍तव्य माजी आमदार विलास लांडे यांनी केले आहे. अशा दोन्ही सूचक वक्‍तव्यामुळे त्यांच्या लोकसभा उमेदवारीची दावेदारी आणखी बळकट मानली जात आहे. याबाबत लांडे म्हणाले की, देश आणि राज्यात परिवर्तनाची नांदी असून परिवर्तन होणार आहे. लोकसभेचे उमेदवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार निश्‍चित करणार आहेत. शिरुर मतदार संघात पक्ष अन्‌ परिवर्तनासाठी मी कामाला लागलो आहे. साहेबांनी आदेश दिल्यास तो पाळणार असल्याचे सांगितले.

पक्षाचा आदेश शिरसावंद्य

मावळ लोकसभेकरिता अजित पवार यांचा मुलगा पार्थच्या नावाची चर्चा असल्याबाबत विचारणा केली असता, राष्ट्रवादीत पक्षकार्याला सर्वोच्च स्थान आहे. पक्षाने दिलेला उमेदवार मग तो कोणताही असो, त्यांचे काम सर्वच पदाधिकारी करणार आहेत, अशी माहिती नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी दिली. तसेच मावळ लोकसभेकरिता संजोग वाघेरे आणि मी स्वत: देखील इच्छूक असल्याचे सांगायला ते विसरले नाहीत.

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने यावेळी शिरुर आणि मावळ मतदार संघातून पक्षाचा खासदार निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. त्यादृष्टीने पक्षाने कामाला देखील सुरुवात केली आहे.

पक्षाच्या नुकत्याच मुंबईत झालेल्या बैठकीत शिरुर लोकसभा मतदार संघातून विलास लांडे यांना कामाला लागण्याचे आदेश दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यानुसार शिररूरमधील कार्यक्रमांना लांडेंनी उपस्थित लावायला सुरुवात केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची उमेदवारी लांडे यांना निश्‍चित असल्याचे मानले जात आहे.

याबाबत पत्रकारांनी विचारले असता विलास लांडे म्हणाले, देश आणि राज्यात परिवर्तनाची नांदी असून परिवर्तन होणार आहे. लोकसभेचे उमेदवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार निश्‍चित करणार आहेत. मी पक्षासाठी कामाला लागलो आहे. राष्ट्रवादीत पवारसाहेबांचा आदेश अंतिम असतो. त्यांचा आदेश पाळणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. साहेबांनी आदेश दिल्यास तो पाळणार असल्याचे सांगत लांडे यांनी आपले मनसुबे जाहीर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)