मावळ : टाकवेत बिबट्याच्या हल्ल्यात बकरीचा मृत्यू

संग्रहित छायाचित्र...

कार्ला – कार्ल्याफाट्याजवळ असलेल्या टाकवे खुर्द या गावात शुक्रवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास बिबट्याने मेंढपाळाच्या वाड्यावर चाल करत एका बकरीचा फडशा पाडल्याने टाकवे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या दीड महिन्यापासून टाकवे खुर्द गावात बिबट्याचा वावर असल्याने नागरिक घाबरले आहेत. मागील महिन्यात देखील बिबट्याने याच गावात धनगराच्या एका घोड्यावर हल्ला केला होता. बिबट्यापासून या गावात मनुष्यहानी झाली नसली तरी भविष्यात काही संकट उदभवण्यापूर्वी या बिबट्याचा बंदोबस्त करा, अशी मागणी टाकवे ग्रामस्थांनी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डोंगराला लागून असलेल्या टाकवे खुर्द गावाचा परिसर हा जंगलमय असल्याने या भागात जंगली प्राण्याचा अधिवास पूर्वीपासून आहे; मात्र मानवी वस्तीत पूर्वी जंगली प्राणी आले नव्हते, आता मात्र जंगलातील प्राणी मानवी वस्तीलगत दिसू लागल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गावातील काही युवकांना गावात येताना रस्त्यालगतच्या डोंगरावर बिबट्या दिसला होता. याबाबत ग्रामस्थांनी वन विभागाला माहिती कळविल्यानंतर बिबट्याचा शोध घेण्यात आला; मात्र तो मिळून आला नाही.

बिबट्याच्या हालचाली टिपण्याकरिता वन विभागाने जंगलात काही ठिकाणी कॅमेरे देखील लावले होते, असे असताना नागरी वस्तीच्या खालील बाजुला 15 डिसेंबर रोजी बिबट्याने धनगरच्या एका घोड्यावर हल्ला करीत त्याला ठार केले होते. त्यानंतर काही दिवस गायब झालेल्या बिबट्याने शुक्रवारी (दि. 12) रात्री पुन्हा मेंढपाळाच्या बकरीवर हल्ला करीत तिला मारल्याने या गावाच्या परिसरात बिबट्याचा अधिवास आणि वावर असल्याचे अधोरेखित झाले आहे.

बिबट्याने बकरी मारल्याची माहिती समजताच वन विभागाने गावात बकरीची व घटनास्थळाची पाहणी केली. या घटनेबाबत बकरी मालकाला नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे वन अधिकारी संजय मारणे यांनी सांगितले.

मारणे म्हणाले की, टाकवे खुर्द हे गाव डोंगराला आणि जंगल परिसरात असल्याने या भागात जंगली प्राण्याचा अधिवास आहे. जंगली प्राणी हे शिकारीच्या शोधात असतात. नागरिकांनी आपली जनावरे आणि प्राणी घरात किंवा गोठ्यात बांधल्यास हे जंगली प्राणी शिकारीकरिता इतरत्र जातील. मागील दोन्ही घटना पाहता धनगरवाडे हे डोंगरालगत असल्याने शिकारी करिता बिबट्याने येथे हल्ला केला आहे. इतरवेळी बिबट्या या भागात आलेला नाही. नागरिकांनी देखील याकरिता खबरदारी घेणे गरजेचे आहे.

वनविभागाच्या वतीने या गावात रात्र गस्त सुरू करण्यात येणार आहे, तसेच रात्रीच्या वेळी फटाके वाजत बिबट्या आणि अन्य जंगली प्राण्यांना गावापासून दूर पळवून लावण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. नागरिकांनी देखील सतर्क रहावे, असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)