प्रभाच वाॅच : मावळ दूध उत्पादक कंपनीच्या दुधाला ‘उकळी’

-धरणग्रस्तांचा इशारा : डेअरी उभारलीच नाही, नुसतीच सभासद वर्गणी

-तर ठोकळवाडी धरणाच्या पाण्यात आंदोलन करू

टाकवे बुद्रुक – धरणग्रस्त कुटुंबीयातील महिलांना स्वयंरोजगार मिळावा याकरिता तीन वर्षांपूर्वीच नावारुपाला असलेली मावळ दूध उत्पादक कंपनीमध्ये अनागोंदी कारभार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. कंपनी गठित होताना सुमारे 931 महिला सभासदांकडून घेतलेले प्रत्येकी 1150 रुपयांच्या सभासद वर्गणीचे काय झाले, प्रकल्प दुर्गम भागात उभारण्याचे ठरले असताना ऐनवेळी टाकवे औद्योगिक वसाहतीमध्ये हलविला. याशिवाय काही सभासदांना हाताशी धरून प्रकल्पासाठी काढलेले लाखो रुपयांचे कर्ज अशा अनेक बाबी यानिमित्ताने चव्हाट्यावर आल्या आहेत. त्यामुळे मावळ दूध उत्पादक कंपनीतील दुधाला उकळी आली आहे.

आंदर मावळातील ठोकळवाडी धरणग्रस्तांसाठी विशेष करून महिलांना स्वयंरोजगार मिळावा यासाठी टाटा पॉवर कंपनीने तीन वर्षांपूर्वी (6 ऑक्‍टोबर 2015) मावळ दूध उत्पादन कंपनी या नावाने डेअरी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी सुमारे 931 महिला सभासदांकडून 1150 रुपये सभासद वर्गणी गोळा केली. या दुर्गम भागात दूध डेअरी उभारण्याचे ठरले; मात्र नंतर हा प्रकल्प टाकवे औद्योगिक क्षेत्रात हलवण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आता सद्यपरिस्थितीत दूध डेअरी सुरू नसतानाही डेअरी सभासद महिलांकडे अधिकचे चार हजार रुपये सभासद वर्गणी मागत असल्याने अनेक सभासदांकडून रोष व्यक्‍त केला जात आहे. या संदर्भात शिवसेना तालुका प्रमुख राजेश खांडभोर, भरत लष्करी, छगन लष्करी, दशरथ वाडेकर, योगेश खांडभोर अनेक सभासदांनी टाटा पावर कंपनीकडे विविध मागण्या केल्या आहेत. तसेच मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदर मावळातील ठोकळवाडी धरणात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

कंपनीच्या नावाखाली दरमहा 50 रुपये…

टाटाच्या अधिकाऱ्यांनी डेअरीचे निवडक संचालक हाताशी धरून हा प्रकल्प टाकवे बुद्रुक या औद्योगिक वसाहतीत हलवला. अनेकांनी विरोध दर्शविला असताना या प्रकल्पाचे कामही सुरू झाले. तसेच या कंपनीच्या नावाखाली महिला सभासदांकडून दर महिना 50 रुपये बचत म्हणून घेण्यात येत आहे. मात्र त्याचा हिशोब ठेवण्यात आला नाही. या प्रकल्प उभारण्यासाठी सात कोटी 85 लाख रुपये कर्ज काढून संपूर्ण महिला सभासदांची फसवणूक केल्याचा आरोप शिवसेना तालुका प्रमुख राजेश खांडभोर, सरपंच गुलाब गभाले, छगन लष्करी व माजी सरपंच संतोषी खांडभोर यांनी केला आहे.

आंदर मावळातील ठोकळवाडी धरणग्रस्तांसाठी विशेष करून महिलांसाठी स्वयंरोजगार निर्मितीचे आश्‍वासन देत टाटा पावर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी 2015 मध्ये धरणग्रस्त महिलांना एकत्रित करीत मावळ दूध उत्पादन कंपनीची स्थापना केली. या कंपनीत सुमारे 931 सभासद असून, सुरुवातीला त्यांच्याकडून 1150 रुपये सभासद वर्गणी म्हणून घेण्यात आली. तसेच धरणग्रस्त भागात दूध डेअरी प्रकल्प उभारून दूग्ध पदार्थ तयार करणार असल्याचे सांगितले होते. टाटा पॉवर कंपनीचे अतुल करवटकर या अधिकाऱ्याने “एएलसी इंडिया’ या कंपनीला डेअरी प्रकल्प उभारण्याचे काम दिले.
निवेदनातील महत्त्वाच्या बाबी…

टाटा कंपनीने हा प्रकल्प स्वखर्चाने उभा करून धरणाच्या दोन्ही बाजूला (वडेश्‍वर ते खांडी) आणि (सावळा ते कशाळ) या ठिकाणी प्रत्येकी एक असे सुधारित आदर्श गोठे उभारावे. तसेच कंपनीसाठी लागणारे कामगार प्रत्येक गावाला न्याय देउन भरती करावेत. गाई व म्हशी घेण्यासाठी शंभर टक्‍के कर्ज उभारणी व आता टाटा पॉवर कंपनीकडून दूध डेअरी सभासदांकडून अतिरिक्‍तचार हजार रुपयांची होणारी मागणी रद्द करावी.

याशिवाय कंपनीमार्फत महिलांवर येणाऱ्या संपूर्ण कर्जाचा भरणा टाटा पावर कंपनीने उचलावा, अशा प्रकारच्या विविध आग्रही मागण्या केल्या आहेत. तसेच याच प्रकारच्या मागण्या ते व सभासद करीत आहेत. परंतु टाटा पावर कंपनीचा भ्रष्ट अधिकारी अतुल करवटकर यांनी शेअर सभासद महिलांना प्रकल्पाची माहिती न देता हिटलरशाही पद्धतीने प्रकल्पावर काम करीत असल्याचा आरोप सरपंच गुलाब गबाले, दशरथ वाडेकर, दत्ता खांडभोर, योगेश खांडभोर यांनी केला आहे. त्यामुळे धरणग्रस्तांची चेष्टा केल्यासारखे होत आहे.

“मावळ दूध उत्पादक कंपनीचे चार हजार शेअर्स वाढविण्याचा प्रस्ताव महिला सभासदांसमोर ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावाला ज्यांची सहमती असेल, त्यांनी सहमती कळवावी, असे आवाहन कळविण्यात आले आहे.
– अनिल करवटकर, अधिकारी, टाटा पॉवर कंपनी.

आंदर मावळातील धरणग्रस्त महिलांसाठी सुरू झालेल्या या दूध डेअरी प्रकल्पात त्यांना योग्य न्याय मिळाला नाही, तर आंदर मावळातील ठोकळवाडी याच धरणात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना तालुका प्रमुख राजेश खांडभोर, छगन लष्करी, माजी सरपंच कैलास खांडभोर, वडेश्‍वर सरपंच गुलाब गबाले, भरत लष्करी, दशरथ वाडेकर, दत्ता खांडभोर, योगेश खांडभोर, उपसरपंच संदीप गराडे, माजी सदस्य शंकर हेमाडे, मावळ दूध डेअरी सभासद आदींनी टाटा पॉवर कंपनी व्यवस्थापक, पुणे जिल्हाधिकारी, मावळ तहसीलदार, वडगाव पोलीस ठाणे यांना निवेदनाद्वारे कळवले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)