कोट्यवधींच्या विकासकामांचे उद्‌घाटन

लोणावळा :विविध विकासकामांचे उद्‌घाटन करताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार बाळा भेगडे, नगराध्यक्षा सुरेखा जाधव आदी.

लोणावळा नगरपरिषद : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शुभारंभ

लोणावळा – लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने नव्याने बांधण्यात आलेल्या वरसोली कचराडेपो, इंद्रायणी नदीवरील पुलाचे उद्‌घाटन आणि नगरपरिषदेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय या अद्ययावत शाळेचे लोकार्पण राज्याचे वित्त, नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शनिवारी (दि. 22) करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महाराष्ट्र शासनाच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत आठ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला अद्ययावत कचरा डेपो तसेच भांगरवाडी येथे इंद्रायणी नदीवर बांधण्यात आलेल्या नवीन पुलाचे उद्‌घाटन आणि नगरपरिषदेच्या सर्वात जुन्या शाळा क्रमांक 1 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय या शाळेची अडीच कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नूतन इमारतीचे लोकार्पण अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर घेण्यात आलेल्या जाहीर सभेपुर्वी लोणावळ्यात मागील दोन वर्षात सुरू करण्यात आलेल्या आणि पूर्ण झालेल्या सुमारे 70 कोटी रुपयांच्या विविध विकासकामाचा आढावा घेणारा माहितीपट दाखविण्यात आला.

या वेळी बोलताना मुनगंटीवार यांनी लोणावळ्याच्या विकासासाठी राज्याच्या तिजोरीसह लोणावळा नगरपरिषदेच्या मागे उभे राहण्याचे आश्‍वासन दिले. पुलासाठी 10 कोटींचा, नंतर बोटिंगसाठी सहा कोटींचा निधी उपलब्ध करून देत असल्याचे सांगत विकासासाठी हवा तितका निधी उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिले. शहराला सुंदर करण्याचे काम फक्‍त नगरपरिषदेचेच नाही, तर ती जबाबदारी येथील नागरिकांची देखील आहे आणि ती प्रत्येकाने पेलली पाहिजे, असे आवाहन लोणावळेकरांना केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी शहरात मागील 20 वर्षांत जी विकासकामे झाली नाही, ती कामे मागील चार वर्षात झाली. आमदार बाळा भेगडे यांच्या सहकार्यामुळे मागील दोन वर्षांत पूर्ण झाल्याचे प्रतिपादन केले.

या वेळी लोणावळ्याचे उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार, पुणे जिल्हा “आरपीआय’चे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, आरोग्य सभापती ब्रिंदा गणात्रा, बांधकाम सभापती गौरी मावकर, पाणी पुरवठा सभापती पूजा गायकवाड, मागासवर्गीय कल्याण समिती सभापती मंदा सोनवणे, शिक्षण समिती सभापती जयश्री आहेर, नगरसेवक राजू बच्चे, देविदास कडू, दिलीप दामोदरे, निखिल कवीश्‍वर, बाळासाहेब जाधव, भरत हारपुडे, सुधीर शिर्के, संजय घोणे, नगरसेविका रचना सीनकर, आरोही तळेगावकर, सुवर्णा अकोलकर, संध्या खंडेलवाल यांच्यासह सुनील तावरे, कमलशील म्हस्के, प्रमोद गायकवाड, विनय विद्वांस आदी लोणावळेकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)