मावळ मतदार संघात स्थानिक, बाहेरचा वाद उफाळणार

पिंपरी  – राज्यभर लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. मावळ मतदारसंघात पार्थ पवार यांच्या उमेदवारीवरून स्थानिक व बाहेरचा असा वाद उफाळून आला आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भूमिपूत्र म्हणून युतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंचा, तर राजपूत्र म्हणून पार्थ यांचा उल्लेख करीत सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. स्थानिक आणि बाहेरचा वाद कोणाच्या पथ्यावर पडणार अशी चर्चा मतदारसंघात रंगली आहे.

2019 च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम जोरात सुरू झाली आहे. शिवसेनेकडून मावळ मतदारसंघात श्रीरंग बारणे, तर राष्ट्रवादीकडून अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार अशी लढत आहेत. या दुरंगी लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. पार्थ पवार हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू असल्याने हा मतदारसंघ राज्यातील महत्वाच्या मतदारसंघापैकी एक ठरला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील आजपर्यंतचे राजकारण नातीगोती, स्थानिक-बाहेरचा या मुद्‌द्‌याभोवतीच फिरले आहे. लोकसभा निवडणुकीचा मतदारसंघ हा तब्बल सहा विधानसभा मतदारसंघात विभागलेला असल्याने लोकसभा निवडणुकीत तरी स्थानिक आणि बाहेरचा हा मुद्दा उपस्थित होणार नाही, असे बोलले जात होते. मात्र निवडणुकीच्या सुरुवातीलाच हा मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे.

पिंपरी-चिंचवड शहर हे “मिनी भारत’ म्हणून ओळखले जाते. सर्व जाती-धर्म-पंथाचे लोक शहरात गुण्यागोविंदाने राहतात. मात्र, राजकारणी स्वस्वार्थासाठीच स्थानिक-बाहेरचा वाद नेहमीच निर्माण करतात.

सध्या लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा उफाळून आला असून, पार्थ पवार यांच्या आयात उमेदवारीवर जहरी टीका होवू लागली आहे. यापुर्वी सुरू झालेला घरभेदी आणि निष्ठावंत हा वाद जिवंत असतानाच आता पुन्हा नव्याने स्थानिक-बाहेरचा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांनी अद्यापतरी या वादात उडी घेतली नसली तरी त्यांची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे.

युतीचे त्रांगडे कायम

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप यांची युती झाली असली तरी मावळ लोकसभा मतदारसंघात मात्र युतीचे त्रांगडे कायम आहे. भाजप आणि शिवसेनेतील वाद दिवसेंदिवस उफाळून येत आहे. हा वाद विरोधकांच्या पथ्यावर पडणारा आहे. भाजपने अद्यापपर्यंत आपला विरोधी सूर कायम ठेवल्याने हा वाद कधी मिटणार? याबाबत चर्चा रंगली आहे. लक्ष्मण जगताप आणि श्रीरंग बारणे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र येण्याची शक्‍यता खूपच कमी असल्याने युतीच्या वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होतो, हे देखील महत्वाचे ठरणार आहेत.

बाहेरच्यांची ताकद दाखवून देवू

स्थानिक-बाहेरचा असा वाद निर्माण करणाऱ्यांना बाहेरुन शहरात आलेल्या नागरिकांची मते नको आहेत का? असा प्रश्‍न शहरात उपस्थित होऊ लागला आहे. स्थानिक- बाहेरचा वाद निर्माण करणारे नेहमीच बाहेरुन आलेल्या लोकांच्या मतावर विजयी होतात आणि राज्यही करतात. असा प्रकार वेळोवेळी घडला आहे. लोकसभा निवडणुकीत हा वाद जाणिवपूर्वक निर्माण केल्यास बाहेरच्यांची ताकद दाखवून देऊ, असे इशारे काही जण देवू लागले आहेत.

आता यशस्वी ठरणार का?

मावळ लोकसभा मतदारसंघात श्रीरंग बारणे हे स्थानिक उमेदवार असून, पार्थ पवार हे आयात उमेदवार आहेत. अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहरावर 15 वर्ष एकहाती राज्य केले. मात्र, ते मावळ लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला जिंकूण देण्यात अपयशी ठरले होते. आपले पुत्र पार्थ पवार यांच्या माध्यमातून ते मावळ राष्ट्रवादीला जिंकून देतानाच आपल्या मुलाला संसदेत पाठविणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)