मावळमधून बारणेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब

पिंपरी – भाजपने मावळची जागा मागितल्याने शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांची उमेदवारी धोक्यात आली होती. मात्र, शिवसेनेने आज जाहीर केलेल्या यादीमुळे बारणेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे. बारणेंच्या उमेदवारीला विरोध करणारे शिवसेनेसह भाजपमधील पदाधिकारी काय भूमिका घेणार याकडे मावळवासियांचे लक्ष लागले आहे.

पूर्वी काँग्रेसमध्ये असलेले श्रीरंग बारणे यांनी 2009 च्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेत प्रवेश केला होता. चिंचवड विधानसभा मतदार संघातून विधानसभेची उमेदवारी त्यांना मिळाली होती. मात्र, त्यावेळी त्यांचा अपक्ष उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी पराभव केला होता. जगताप यांच्या विजयासाठी राष्ट्रवादीची मॅच फिक्सिंग कारणीभूत होती, असे सांगण्यात येते. त्यानंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत बारणे-जगताप यांचा पुन्हा आमना-सामना झाला. त्यात बारणे यांनी शेकापकडून उमेदवारी घेतलेले जगताप यांचा पराभव करत उट्टे काढले.

बारणे व जगताप यांच्यातील हाडवैर सर्वश्रुत आहे. आमदार जगताप हे भाजप शहराध्यक्ष आहेत. मावळची जागा भाजपला देण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यातच शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी देखील बारणेंच्या उमेदवारीला विरोध केला होता. अखेर या सर्वांवर मात करत बारणे यांनी शिवसेनेचे तिकीट आपल्या खिशात टाकले आहे. बारणे यांची लढत अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्याशी होणार आहे. पवार कुटुंबियांनी पार्थ यांच्यासाठी ताकद पणाला लावल्याने या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

आढळराव चौथ्यांदा रिंगणात
शिरुर लोकसभा मतदार संघातून सलग तीन वेळा विजय मिळविणारे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना शिवसेनेने शिरुरमधून उमेदवारी जाहीर केली. आढळराव पाटील यांचा सामना पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेले तसेच आत्ता राष्ट्रवादीत डेरेदाखल झालेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्याशी रंगणार आहे. मतदारांना भूूरळ कोण घालणार? नेता की अभिनेता?, अशी खुमासदार चर्चा शिरुर मतदार संघात रंगली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)