जागा वाटपात ‘मावळ’वर आता बसपाचा दावा

काही दिवसांपूर्वी सपा शहराध्यक्षाने जाहीर केली होती स्वतःची उमेदवारी

पिंपरी – उत्तरप्रदेशात महागठबंधन करणाऱ्या सपा आणि बसपाने महाराष्ट्रातही आपले उमेदवार निवडणुकीत उतरवण्याची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष रफिक कुरैशी यांनीा आपल्याला मावळची उमेदवारी मिळाली असल्याचे जाहीर केले होते. सपाचे प्रदेशाअध्यक्ष अबू आझमी यानी उमेदवारी दिली असल्याचे सांगितले होते, परंतु आता बसपाचे प्रदेश महासचिव किरण आल्हाट यांनी मावळची जागा बसपाकडे असल्याचा दावा केला आहे.

बसपाच्या पदाधिकाऱ्यांकडून दावा करण्यात आला आहे की, मावळ लोकसभा मतदार संघातील पिंपरी, चिंचवड, मावळ, उरण आणि कर्जत-खालापूर या विधानसभा मतदार संघांमध्ये बसपाची संघटनात्मक बांधणी चांगली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईत पार पडलेल्या सपा-बसपाच्या संयुक्‍त पत्रकार परिषदेत राज्यात सपा 4 तर बसपा 44 जागा लढणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यानंतर सपाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष रफिक कुरेशी यांनी मावळची उमेदवारी आपल्याला जाहीर झाल्याची माहिती दिली होती. मात्र, त्यांचा हा दावा बसपा पदाधिकाऱ्यांनी खोडून काढला आहे.

“जागा वाटपात मावळची जागा बसपासाठी सोडण्यात आली आहे. मावळकरिता बसपकडे एकूण पाच इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. बसपाचे प्रदेश प्रभारी खासदार डॉ. अशोक सिद्धार्थ, प्रमोद रैना आणि प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी इच्छुकांची मुलाखत घेतली आहे. येत्या दोन दिवसांत मावळमधील उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात येईल.
– किरण आल्हाट, प्रदेश महासचिव, बसपा

2009 च्या लोकसभेत बसपाकडून उमाकांत मिश्रा यांनी निवडणूक लढवली होती आणि त्यांना 20 हजार 455 मते मिळाली होती. गेल्या लोकसभेच्या रिंगणात बसपकडून टेक्‍सास गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी 29 हजार मते मिळविली होती. त्यावेळी समाजवादी पक्षाने तत्कालीन रायगड जिल्हाध्यक्ष अनिल नाईक यांना उमेदवारी दिली होती. मात्र ते वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करू शकले नाहीत. त्यामुळे पक्षादेशानुसार समाजवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे राहुल नार्वेकर यांचा प्रचार केला. आता सपा-बसपा आघाडी राष्ट्रवादीविरोधात रिंगणात उतरणार असल्याने, याचा काही अंशी फटका राष्ट्रवादी कॉंग्रेसला बसण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

“मावळ लोकसभा मतदार संघात मुस्लिम मतदारांची संख्या दोन लाख 60 हजार, तर उत्तर भारतीय मतदारांची संख्या सुमारे पाच लाख एवढी आहे. हा मतदार संघ बसपला सोडल्याची बाब मला समजली आहे. त्यामुळे बसपा देईल, त्या उमेदवाराचे काम आम्ही निष्ठेने करु.
– रफिक कुरेशी समाजवादी पक्ष, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)