मावळसाठी शहर भाजपकडून ‘दबावतंत्र’

गडकरींपाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट : मावळमधून जगतापांच्या उमेदवारीसाठी आग्रही

पिंपरी – लोकसभा निवडणुकीसाठी सेना-भाजपची युती झाली असली, तरीही मावळची जागा भाजपकडे घ्यावी आणि शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी शहर भाजपच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. पुण्यात एका कार्यक्रमासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पिंपरी-चिंचवड भाजप पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली व आग्रही मागणीचे निवेदन सादर केले.

गडकरींपाठोपाठ मुख्यमंत्र्यांना साकडे

काही दिवसांपूर्वी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे चिंचवडमधील एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्याकरिता आले असता, भाजपच्या काही नगरसेवकांनी याच मागणीचे निवेदन गडकरी यांना दिले होते. त्यानंतर सेना-भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये एकामेकांची उणी-दुणी काढण्यासाठी चांगलीच पत्रकबाजी सुरू झाली होती. त्यानंतर आता पुन्हा भाजप पदाधिकाऱ्यांनी बारणे यांच्या उमेदवारीला उघडपणे विरोध करत, जगताप यांच्या उमेदवारीचे समर्थन केले आहे.

मावळ लोकसभा मतदार संघातील बहुतांशी सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था भाजपच्या ताब्यात आहेत. या मतदारसंघात भाजपाची ताकद वाढली आहे. लक्ष्मण जगताप हेच युतीचे सक्षम उमेदवार ठरतील. शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना युतीची उमेदवारी दिली तर त्यांच्याविषयी असलेल्या नाराजीचा फटका बसून, त्यांचा निश्‍चितपणे पराभव होईल, असे राजकीय समीकरण शहर भाजपने मांडले आहे. जगताप यांना उमेदवारी दिली तर ते प्रचंड मतांनी निवडून येतील. त्यामुळे मावळ लोकसभेची जागा भाजपासाठी घेऊन, लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी सभापती ममता गायकवाड, नगरसेवक शत्रुघ्न काटे, नामदेव ढाके, संदीप वाघेरे, चंद्रकांत नखाते, सागर आंगोळकर, राजेंद्र गावडे, शितल शिंदे, अभिषेक बारणे, तुषार कामठे, तुषार हिंगे, सुरेश चिंचवडे, कैलास बारणे, नगरसेविका झामाबाई बारणे, निर्मला कुटे, आरती चोंधे, उषा मुंढे, माधुरी कुलकर्णी, माया बारणे, अर्चना बारणे, शर्मिला बाबर आदी नगरसेवक उपस्थित होते.

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मावळ लोकसभा भाजपसाठी ठेवण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. या मागणीबाबत मी काही ना काही करतो, असे आश्‍वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले आहे. यापूर्वी देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना शहर पदाधिकाऱ्यांनी याच मागणीचे निवेदन दिले आहे. जिंकून येण्याच्या निकषावर मावळची उमेदवारी जगताप यांना द्यावी, अशी आमची आग्रही मागणी आहे. त्यावर आम्ही ठाम आहोत.
-एकनाथ पवार ,सत्तारूढ पक्षनेता, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)