मावळात भगवाच

संग्रहित छायाचित्र....

श्रीरंग बारणे यांना कौल : पवारांचा 2 लाखांहून अधिक मतांनी पराभव
पुणे – यंदा राष्ट्रवादी कॉंग्रेसने मावळ मतदारसंघावर विशेष लक्ष देत पवार घराण्याकडे उमेदवारी घेत अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. मात्र, तब्बल 50 वर्षांच्या राजकारणात कधीही पराभव न पाहिलेल्या पवार कुटुंबीयांना या निवडणुकीत पराभवाची चव चाखावी लागली आहे. शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी जवळपास सर्वच मतदारसंघात मोठी आघाडी घेत विजय खेचून आणला आहे. मावळच्या माध्यमातूनच बारणे यांनी पवार घराण्याला पराभूत करण्याची किमया साधली आहे. धक्‍कादायक बाब म्हणजे बारणे यांनी पार्थ यांचा तब्बल 2 लाख 15 हजार 575 मताधिक्‍क्‍याने पराभव केला आहे.

गेल्या पंधरा वर्षांच्या कालावधीत शिवसेनेने मावळ आणि शिरुर तालुक्‍यांत आपले वर्चस्व निर्माण केले होते. गेली दहा ते पंधरा वर्षे बालेकिल्ल्यांमध्ये होत असलेला हा पराभव राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागला होता, त्यामुळेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी स्वत: माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेत नातू पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र, प्रचाराच्या कालावधीत शिवसेनेच्या उमेदवाराला जखडून ठेवणे राष्ट्रवादीच्या नेत्यांना जमले नाही.

पिंपरी-चिंचवडसह मावळ, उरण, पेण आणि पनवेल या विधानसभा मतदारसंघात शेकापच्या प्रभावामुळे तेथून चांगले मताधिक्‍य मिळेल, असा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा व्होरा होता. मात्र, त्यांचा हा अंदाज सपशेल चुकीचा ठरला. गुरुवारी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होताच, बारणे यांनी पहिल्या फेरीपासूनच मोठी आघाडी घेण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे, कोणत्याही मतदारसंघात आणि फेरीमध्ये ही आघाडी कमी करणे पार्थ पवार यांना शक्‍य झाले नाही.

शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना 7 लाख 18 हजार 950 मते मिळाली, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांना 5 लाख 3 हजार 375 मते मिळाली. बारणे हे पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर असल्याने भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते, तर मोठ्या आघाडीने पराभव समोर दिसताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणीच्या केंद्रावरून काढता पाय घेतला. तर इतका मोठा पराभव झाल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एकही बडा नेता मतमोजणी केंद्राकडे फिरकला नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here