माऊलींच्या गजराने सासवडनगरी दुमदुमली

एन. एस. जगताप
घरोघरी बसल्या वारकऱ्यांच्या पंगती

सोपान म्हणे देवोत्तमा ।
पूर्वी येथे होता ब्रह्मा ।।
आणि तुम्ही पुरूषोत्तमा रामा।
कोणे स्थळी होते ती
देव म्हणे कथा परिस ।
आम्ही होतो पंढरीस ।।
कोट्यान कोटी युगास ।
अनंत कल्पे गेलीया ।।

सासवड  – येथे माऊलींच्या पालखी सोहळा मुक्‍कामी असल्याने सासवडनगरी माऊलीमय झाली होती. “विठू नामाचा गजर विठू नामाचा जयघोष’ करीत येथील पालखी तळावर विसावलेल्या माऊलींच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी दोन ते तीन किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रिमझिम पावसाच्या सरी बरसत असतानाही वारकरी माऊलींच्या दर्शनाच्या ओढीने सासवडच्या पालखी तळाकडे ओढले जात होते. त्यामुळे तळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर फक्त वारकरीच वारकरी चहुकडे दिसत होते.

वैष्णवांच्या मांदियाळीमुळे सासवडनगरीला प्रति पंढरीचे रूपच प्राप्त झाल्याचा आभास निर्माण होत होता. शहरातील विविध ठिकाणी वारकऱ्यांच्या सेवेसाठी फराळ, फळे, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, चहा, चिक्‍की आदी खाद्यपदार्थांच्या वाटपाचे स्टॉल उभारण्यात आले होते. घरोघरी वारकऱ्यांच्या भोजनासाठी पंगतीचे आयोजन केले होते.

वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या डॉक्‍टरांनी वारकऱ्यांच्या सेवेसाठी विविध ठिकाणी मोफत आरोग्य, डोळे तपासणी शिबिरांचे आयोजन केले होते. शहरातील विविध स्वयंसेवी संस्था, संघटना व काही जागरूक नागरिकांनी स्वतःहून स्वयंसेवक बनत मार्गदर्शन करण्याचे काम केल्यामुळे वारकऱ्यांच्या बऱ्याच अडचणी दूर झाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)