माऊलींचे आज जिल्ह्यात आगमन

पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी जिल्हा सज्ज : लोणंदला आज मुक्काम

लोणंद  – श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज यांचा पालखी सोहळा मंगळवारी सातारा जिल्ह्यात प्रवेश करीत आहे. यावर्षी देखील जिल्ह्यात चार मुक्कामांसाठी पालखी सोहळ्याचे आगमन होत आहे. यापैकी पहिला मुक्काम हा लोणंद येथे असणार आहे, तर दुसऱ्या मुक्कामासाठी लोणंदमधील एक दिवसाचा मुक्काम आटोपल्यानंतर फलटण तालुक्‍यातील तरडगाव येथे 3 जुलै रोजी वैष्णवांचा मेळा विसावणार आहे.

जिल्ह्यात आगमन होताच पाडेगाव हद्दीत दत्तघाट येथे माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान होणार आहे. त्यानंतर समता आश्रम शाळेसमोर सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने माऊलींचे स्वागत करण्यात येणार आहे. या ठिकाणी प्रशासनाच्यावतीने मंडप उभारून सुशोभिकरण करण्यात आले आहे. यावेळी आगमन सोहळ्याला लोकप्रतिनिधी तसेच सर्व विभागातील प्रशासकीय अधिकारी वर्ग उपस्थित राहणार आहेत.

यावेळी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर पालखी सोहळा संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास लोणंद शहरात पोहचल्यावर लोणंद नगरपंचायतच्यावतीने पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात येऊन माऊलींचे पालखी लोणंद मुक्कामाला पालखीतळावर विसावेल. पालखी सोहळा बंदोबस्ताची पाहणी करण्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके यांनी लोणंद पालखी तळाची पाहणी करून उपयुक्त सूचना दिल्या. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)