जीवनगाणे: आयुष्याचं गणित

अरुण गोखले

नित्याची प्रार्थना झाली. दोन मिनिटांचे ध्यान लावून झाले,.नमन झाले आणि सर्वजण महाराज आजच्या सतसंगात काय सांगतात हे ऐकायला उत्सुक झाले.

महाराज म्हणाले, सुजनहो! आयुष्य हे एक गणित आहे. प्रत्येकाला ते ज्याचे त्यालाच सोडवावे लागते. ते सोडवता आले, त्याच्या शेवटच्या सुखा समाधानाच्या उत्तरापर्यन्त जाता आले तर त्याच्या सारखा दुसरा आनंद नाही. पण बऱ्याच लोकांची अशी तक्रार असते की आम्ही खूप खटाटोप केले, प्रयत्न केले, नाना मार्ग शोधले, हाताळले, त्यावर चालण्याचा प्रयत्नही केला, पण आम्हाला काही हे जीवनाचे गणित म्हणावे तसे सोडवता येत नाही. त्यासाठी काय करावे? हेच कळत नाही.
आज आपण याच समस्येच उत्तर शोधणार आहोत. बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार हे गणिताचे चार प्रमुख भाग. आयुष्याच्या गणितातही ते तितकेच महत्त्वाचे असतात. आता नेमकी कशाची बेरीज करायची? कशातून काय वजा करायचे? कशाचा गुणाकार करायचा? आणि भागाकार कशाचा करायचा? हे ज्याला समजले ना, तोच हे जीवनाचे गणित अगदी सहजपणे सोडवू शकतो.

जीवनात प्रत्येकाच्याच वाट्याला त्याच्या त्याच्या प्रारब्धाप्रमाणे बरी वाईट परिस्थिती प्राप्त झालेली असते. कोणालाही आपले प्रारब्ध बदलता येत नाही. ते बदलता येत नसले तरी त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र हमखास बदलता येतो. नकारात्मक विचारसरणी न ठेवता सकारात्मक विचारसरणीने जीवनाकडे पाहणे ही सुखाची खरी गुरू किल्ली आहे.

जीवनाच गणित सोडवताना आपण काय करायचं? तर आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टीतून, प्रसंगातून सुखाच्या क्षणांची, अनुभवांची, आनंदाची बेरीज करत जायची. जे काही दु:ख असेल, त्रास, यातना, क्‍लेष असतील अशा दु:खाला एक एक करून आपल्या साठवणीतून वजा करत जायचं.

एक चांगला माणूस म्हणून स्वत:ला घडवून घेत असताना आपण आपल्यातल्या गुणांचा गुणाकार करुन ते वाढवत न्यायचे. आपल्या वाईट सवयी विचार, संकल्पना, मते यासारख्या दुर्गुणांचा भागाकार करत जायचे. सुखाची बेरीज, दु:खाची वजाबाकी, सदगुणांचा गुणाकार आणि दुर्गुणांचा भागाकार हेच जीवनाच्या गणिताचे चार भाग लक्षात ठेवायचे. या गोष्टी जर आपल्याला कौशल्य पूर्वक करता आल्या तर जीवनाचं गणित सोडवणं काहीच अवघड नाही. हां त्यासाठी प्रयत्न मात्र करायला हवेत ही गोष्ट विसरून चालणार नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)