विज्ञानविश्‍व: जुळ्यांची गोष्ट

डॉ. मेघश्री दळवी

अगदी एकसारखी दिसणारी जुळी भावंडं अनेक असतात. पण त्यातले कितीजण एकाच क्षेत्रात कामगिरी करतात? त्यातून ते क्षेत्र अवकाशप्रवासाचे असणे किती दुर्मीळ असेल विचार करा! मात्र, स्कॉट आणि मार्क केली हे दोघे जुळे भाऊ नासाचे अंतराळवीर आहेत. दोघेही आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर (इंटरनॅशनल स्पेस स्टेशन) राहून आलेले आहेत. असा विक्रम करणारे ते एकमेव आहेत, हे खास. त्यांच्या याच वैशिष्ट्यांमुळे नासाने एक विशेष कार्यक्रम आखला आहे. ट्विन स्टडी या कार्यक्रमांतर्गत दीर्घ काळ अवकाशात वास्तव्य केल्यावर माणसाच्या डीएनएवर काय परिणाम होतो याचा अभ्यास होत आहे. आज चंद्रावर आणि मंगळावर मानवी वसाहत उभारण्याच्या मोहिमा आकार घेत आहेत. अशा वेळी हा अभ्यास महत्त्वाचा ठरणार आहे.

स्कॉट 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर एक वर्षाहून अधिक काळ राहिला. त्याच दरम्यान मार्क पृथ्वीवर होता. एकसारखे दिसणारे जुळे असल्याने दोघांचे डीएनए जवळजवळ एकसारखे आहेत. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर जायच्या आधी दोन्ही भावांच्या डीएनएचा पूर्ण अभ्यास करून ठेवला होता. स्कॉट परत आल्यावर या विशिष्ट काळात दोघांच्याही डीएनएमध्ये काही बदल झाला का, याची सखोल चाचणी केली.

स्कॉट 2016 मध्ये अवकाशातून परत आला त्यावेळी त्याच्या डीएनएमध्ये लहानलहान काही बदल दिसून आले. एरव्हीही आपल्या डीएनएमधे सूक्ष्म बदल घडू शकतात. त्यामुळे तुलनेसाठी त्याच काळात मार्कच्या डीएनएमधे झालेल्या बदलांची चाचणी करण्यात आली. तेव्हा स्कॉटच्या डीएनएमधे बरेच बदल झालेले आढळले. हे अर्थातच सामान्य बदल नव्हते, तर अवकाशातल्या विकिरणांमुळे (रेडिएशन) झालेले मूलभूत बदल होते. हे निरीक्षण धक्‍कादायक होते. अवकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न अधुरेच राहाते आहे की काय असे त्यावेळी वाटले होते.

म्हणून वर्षभराने 2017 मध्ये आणि नंतर 2018 मध्ये स्कॉटच्या पुन्हा चाचण्या केल्या तेव्हा त्यातले काही बदल पूर्ववत झालेले होते. तुलनेसाठी मार्कच्या चाचण्याही होत होत्या. त्यामुळे आता नासाने आपल्या निष्कर्षात भर घातली आहे की, सामान्य प्रमाणात विकिरणांचा डोस मिळाला, तर विकिरणांच्या बाहेर आल्यावर साधारण सहा महिन्यांमध्ये डीएनएमधील बदल दूर होऊ शकतात. अवकाश मोहिमांसाठी हा खरोखरच एक मोठा दिलासा आहे.

या व्यतिरिक्‍त आणखी एक विशेष बाब या अभ्यासात आढळली. स्कॉटच्या डीएनएच्या टोकांशी असलेले टेलोमियर्स अवकाशात असताना वाढले, मात्र पृथ्वीवर आल्यावर ते आकुंचीत होऊन मूळ लांबीपेक्षा कमी झाले. टेलोमियर्सचा संबंध माणूस वृद्ध होण्याशी आणि एकूण किती काळ जगू शकेल याच्याशी असल्याने यावर अधिक संशोधन होणार आहे. शिवाय स्कॉटच्या डोळ्यातील रेटिनाचे मज्जातंतू अधिक जाड झालेले दिसले आहेत. यामागे विकिरण असण्यापेक्षा अवकाश स्थानकातील अत्यल्प गुरुत्वाकर्षण असावे असा एक अंदाज आहे. जुळ्यांच्या या अभ्यासातून एक गोष्ट निश्‍चितच पुढे आलेली आहे की, अवकाश प्रवासात माणसाच्या शरीरात लहानमोठे बदल होऊ शकतात. ते किती गंभीर आहेत याकडे आता पुढे लक्ष असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)