मातंग समाजाचा ‘एल्गार’

जय लहुजी, जय अण्णा भाऊ साठेंच्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणले

नगर – मातंग समाजाच्या विविध प्रश्‍न व मागण्यांसाठी वाडियापार्क येथून भर पावसात निघालेला हा मोर्चा स्टेशनरोड मार्गे चांदनी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जय लहुजी जय अण्णा भाऊ या घोषणांनी जिल्हाधिकारी परिसर दणाणून गेला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मातंग समाजबांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

सकल मातंग क्रांती मोर्चाच्या वतीने अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा, पारनेर तालुक्‍यातील नितीन साठे प्रकरण जलदगती न्यायालयामध्ये खटला चालवावा, या प्रमुख पंधरा मागण्यांसाठी वाडियायापार्क येथून आज सकाळी अकरा वाजता सकल मातंग समाजाच्या मोर्चेकऱ्यांकडून हाक देण्यात आली होती. समाजाने आयोजन केल्यामुळे सकाळपासून भर पावसात मातंग समाजबांधव पिवळे झेंडे घेऊन शहरात दाखल झाले. पावसाची तमा न बाळगता युवक-युवतीं मोठ्या संख्येने वाडियापार्क येथे गर्दी केली. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास सकल मातंग समाजबांधवांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

समाजातील सात युवतींनी बुलंद आवाजात दुपारी सव्वाबाराच्या सुमारास मातंग समाजावरील अन्याय अत्याचाराचा पाढा वाचला. त्यानंतर स्वस्तिक चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, कोठी, चांदणी चौक मार्गे मातंग क्रांती मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी तीन वाजता धडकला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभारलेल्या मंचासमोर या सात युवतींनी प्रमुख मागण्यांसह समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचा पाढा वाचला. मातंग समाजातील जनतेच्या असलेल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयावर हा सकल क्रांती मोर्चा पोहोचल्यावर युवतींनी आपल्या भाषणातून समाजाची वेदना पोटतिडकीने व्यक्‍त केली. सुमारे तासभर समाजाच्या प्रतिनिधींनी या द्वारसभेत भावना व्यक्‍त केल्यानंतर राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता झाली. राष्ट्रगीत सुरु असताना मोर्चातील अबाल वृद्ध, माता, भगिनी व युवक स्तब्ध उभे होते.

घोषणांचा पाऊस

सकल मातंग समाजाचा शांततेत निघालेल्या मार्चात हजारो मातंग बांधव सहभागी झाले होते. भर पावसात कशाचीही तमा न बाळगता अन्याय अत्याचारा विरोधात पाढा वाचत मोठ्या पोटतिडकीने मातंगा तू जागा हो, संघर्षाचा धागा हो! जय लहुजी…जय लहुजी.! लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंचा विजय असो! मोर्चेकऱ्यांनी अशा घोषणांचा अक्षरक्ष: जिल्हाधिकारी परिसरात पाऊस पाडला होता.

मातंग क्रांती मोर्चाच्या प्रमुख मागण्या

सकल मातंग क्रांती मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यावर मार्चेकऱ्यांनी पंधरा प्रमुख मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनास दिले. लातूर जिल्ह्यातील रुद्रवाडी येथील 24 कुटुंबावर झालेल्या बहिष्कार प्रकरणी संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी, जळगाव वाकडी येथील विहीर बाटवल्याचा राग धरून अल्पवयीन मुलांवर केलेल्या अत्याचार प्रकरणी आरोपावर कठोर कारवाई करावी, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा व अणा भाऊ साठे जयंती दिनी शासकीय सुट्टी घोषित करावी, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, अण्णा भाऊ साठे व क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारकाला निधी उपलब्ध करून त्वरित कामकाज सुरु करावे, पारनेर तालुक्‍याती नितीन साठे प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, भीमा कोरेगाव दंगलीतील मुख्य सूत्रधार संभाजी भिडे यांना त्वरीत अटक करावी, आदी पंधरा प्रमुख मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)