दिल्ली आणि लखनौमध्येही मसुद अझहरचा मुक्काम होता

नवी दिल्ली – जैश ए मोहम्मदचा म्होरक्‍या मसुद अझहर 1994 च्या जानेवारीमध्ये जेंव्हा भारतात पहिल्यांदा आला होता, तेंव्हा त्याचा मुक्काम दिल्लीतील आलिशान चाणक्‍यपुरी भागातच होता. या भागामध्ये वरिष्ठ अधिकारी आणि मुत्सदी विदेश अधिकाऱ्यांची घरे आहेत. यावेळी त्याच्याकडे पोर्तुगीज पासपोर्ट होता. यावर मसुदने इमिग्रेशन अधिकाऱ्यांना आपण जन्माने गुजराथी असल्याचे सांगितले होते. दिल्लीतील जनपथ हॉटेलमध्येही त्याचा मुक्काम होता.

लखनौ, सहारणपूर आणि इस्लामी शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या दारुल उलूम देवबंदलाही भेट दिली होती, असे चौकशीच्या अहवालामध्ये म्हटले आहे. दिल्लीतील वास्तव्यानंतर पुढील दोनच आठवड्यात मसुदला जम्मू काश्‍मीरमध्ये अटक करण्यात आली होती. संसदेवर 2001 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्‌यासह गेल्या महिन्यात पुलवामामध्ये सीआरएएफ’च्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्‌यासह भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्‌यांसाठी मसुद अझहर जबाबदार आहे. अटकेनंतरच्या चौकशीत त्याने स्वतःच आपल्या वास्तव्याबाबतची माहिती दिली होती.

बांगलादेशला भेट दिल्यानंतर तो बनावट पोर्तुगीज पासपोर्टच्या आधारे भारतात आला होता. विमानतळावरून टॅक्‍सी घेऊन चाणक्‍यपुरीतील अशोका हॉटेलवर आला. त्यावेळी हरकत उल अन्सार या दहशतवादी संघटनेचा सदस्य अबु मेहमूदही त्याच्या समवेत होता. देवबंदला जाऊन तेथील देवबंदी बुद्धीवंतांप्रती आदरांजली वाहण्याची त्याची ईच्छा होती. अशर्रफ दरने त्याच्या मारुती कारमधून अबु मेहमूदसह मसुदला देवबंदला नेले. तेथे तो रात्रभर राहिला. देवबंदमध्ये प्रार्थना केल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी गुन्गोहला आणि नंतर सहारणपूरला गेला, सहारणपूरमध्ये तबलिक उल जमात मशिदीत मुक्काम केला. या सर्व प्रवासात त्याने आपली खरी ओळख सांगितली नाही. जलालाबादएत मौलाना मसिर उल उल्लाह खान यांच्याकडे रात्रभर राहिल्यानंतर 31 जानेवारी 1994 रोजी तो पुन्हा दिल्लीला आला. दिल्लीत कॅनॉट प्लॅसजवळच्या जनपथ हॉटेलवर राहिला.

श्रीनगरसाठी 9 फेब्रुवारीचे तिकीट असल्यामुळे लखनौला मौलाना अबु हसन नडवी उर्फ अली मिलान यांच्या मदरसामध्ये जाण्याचे त्याने ठरवले. त्यानुसार 6 किंवा 7 फेब्रुवारीला मसुद बसने लखनौला गेला. तेथेही त्याने आपली ओळख सांगितली नाही. तेथून बसने तो दिल्लीला परतला. यावेळी तो करोल बाग भागात शीश महल हॉटेलवर राहिला. अझहरने स्वतःचे पासपोर्टवरील वली आदम इस्सा असे नाव तेथील रजिस्टरमध्ये लिहीले.

8 फेब्रुवारीला निझामुद्दीनला तबलिग उल जमातमध्ये तो गेला पण तेथे कोणालाही भेटला नाही. काश्‍मीरमधील दहशतवाद्यांना भेट देण्यासाठी त्याने 12 होकायंत्रे विकत घेतली. 9 फेब्रुवारीला तो श्रीनगरला आला. कासमियान मदरसामध्ये त्याच्यासाठी खोलीची व्यवस्था करण्यात आली होती. संध्याकाळी हरकत उल जिहाद अल इस्लामी या संघटनेचा दहशतवादी सज्जाद अफगाणी आणि त्याचा सहकारी अमजद बिलाल मसुदला भेटायला आले. दुसऱ्या दिवशी मसुदला मातिगुंड या अफगाणी ठिकाणी नेण्यात आले. येथे सर्व पाकिस्तानी दहशतवादी जमले होते.

मसुदच्या भेटीने आणि सर्व पाक दहशतवादी आनंदित झाले. त्यांच्या कुटुंबीयांना खुशाली कळवण्यासाठी मसुदने त्यांचे पत्ते घेतले. मातिगुंडमध्ये परतताना एक अफगाणी आणि फारुख नावाचा दहशतवादी त्याच्या समवेत होते. कार बंद पडल्याने ते रिक्षाने अनंतनागला निघाले. वाटेत लष्करी जवानांनी रिक्षा अडवली. गोळीबार करत फारुख पळून गेला. पण अफगाणी दहशतवादी आणि मसुद पकडले गेले, असे या चौकशी अहवालात म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)