सातारा एलसीबीची कारवाई; दोन जिवंत काडतुसे जप्त
सातारा – कराड तालुक्यातील कोपर्डी येथील रेल्वे गेट परिसरात एक गावठी पिस्टल बाळगून मोटरसायकलवरून फिरणाऱ्या एका तरूणाला सातारा येथील गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी धनंजय मारूती वाटकर (रा. सैदापूर, कराड)
याला अटक करण्यात आली आहे. तसेच वाटकर याला बेकायदेशीर पिस्टल दिल्याप्रकरणी त्याचा मित्र गणेश उर्फ सनी सुनिल शिंदे (रा. ओगलेवाडी, ता. कराड) याचा पोलीस शोध घेत आहेत. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेने दिलेली अधिक माहिती अशी की, गुरूवार, दि.11 रोजी रात्री बाराच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड व त्यांचे सहकारी कोपर्डे हवेली (ता. कराड) या गावाच्या परिसरात रात्रगस्त घालत होते. पोलीस कोपर्डे गावच्या हद्दीत असणाऱ्या रेल्वे गेटवर आल्यानंतर (एमएच 50 जी 6442 ) या दुचाकीवर एक युवक संशयास्पद बसून असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला थांबण्याचे कारण विचारले असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र,पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले.
पकडल्यानंतर पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे आढळली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता पिस्टल बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याचे सांगत स्वत:च्या रक्षणासाठी मित्र गणेश उर्फ सनी सुनिल शिंदे याच्याकडून आणल्याची कबुली त्याने दिली. त्यानंतर पोलिसांनी दोघांच्यावरही कराड तालुका पोलीस ठाण्याता गुन्हा दाखल केला.