स्मरण: मर्ढेकरांची कविता…

श्रीनिवास वारुंजीकर

मराठी कवितेला एक नवी दिशा देणारे आणि आपल्या आगळ्या-वेगळ्या लेखनशैलीद्वारे आपली एक अमिट अशी नाममुद्रा मराठी कवितेच्या क्षेत्रात उमटवणारे युगप्रवर्तक कवी बाळ सीताराम अर्थात बा. सी. मर्ढेकर यांची आज 20 मार्च रोजी 63 वी पुण्यतिथी. मर्ढेकर यांच्या कवितेची जातकुळी ही अन्य कोणत्याही कवीच्या जातकुळीपेक्षा निराळी आहे. आज सर्वच पातळ्यांवर सांस्कृतिक अनाचार बोकाळत असताना, अभिरुचीचे अवमूल्यन होत असताना, दर्जेदार साहित्य काय असते, विशुद्ध भावकविता काय असते, नव्या युगाची कविता किती आशयसंपन्न लिहिली जाऊ शकते, याचे समर्थ आणि सशक्‍त उदाहरण म्हणून मर्ढेकरांच्या कवितेकडे लक्ष वेधणे आवश्‍यक ठरले आहे.

मर्ढेकरांची कविता म्हणजे मराठी साहित्यातील अभूतपूर्व असे एक लेणे आहे. मर्ढेकरांच्या नव्या कवितेनं संपूर्ण मराठी वाङ्‌मयविश्‍वाला एक जबरदस्त हादरा बसला. महायुद्धोत्तर काळातील निराशा आणि यंत्रयुगाने आलेल्या क्षणभंगुरतेमधील, सामान्य माणसाची घुसमट या कवितेनं मोठ्या प्रमाणावर पेलली. आशयाचं सूत्र सांभाळताना परंपरागत साहित्यिक समजांना ध का देण्याच्या, मर्ढेकरांच्या काव्यप्रतिभेनं आपली नाममुद्रा मराठी साहित्यावर उमटवली आहे. त्यामुळेच मराठी काव्यपरंपरेचा वेध घेताना, मर्ढेकर-पूर्व आणि मर्ढेकर-उत्तर असे स्पष्ट भेद करावे लागतात. त्यामुळेच मर्ढेकरांना युगप्रवर्तक कवी असं म्हणावं लागतं. कविता लिहिण्याबाबत मर्ढेकरांची ठाम अशी एक भूमिका होती.

लोकरंजनार्थ अथवा स्वान्त सुखाय कविता लिहिणं, त्यांना मान्य नव्हतं. कविता लिहिताना कवीची जबाबदारी वाढलेली असते, असं ते मानत. उगाचच यमक जुळवले आणि अलंकार-रुपकांचे कोंदण दिले की, कविता लिहिता येते, ही भूमिका त्यांना मान्य नव्हती. कवीनं नव्हे; तर त्याच्या कवितेनं बोललं पाहिजे, असे ते म्हणत. जन्मस्थान असलेली खानदेशाची भूमीच नव्हे, तर भारताच्या कानाकोपऱ्यात भ्रमंती केलेल्या मर्ढेकरांनी युरोपवारीही केली. इतका प्रवास करूनही, त्यांची कविता मात्र कधीही प्रदेशनिष्ठ राहिली नाही. संपूर्ण मानवजातीच्या वेदनेचंच प्रतिबिंब त्यांच्या कवितेत सातत्यानं विविध रूपांतून पडत गेलं.

अत्यंत समर्पक आणि मोजक्‍या शब्दांत स्वत:च्या आयुष्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन व्यक्‍त करताना दैववाद, यंत्रयुगाचे परिणाम आणि असहाय्यतेचे पदर त्यांनी या कवितेत नेमकेपणाने उलगडले आहेत. स्वत:चं अस्तित्व नक्‍की कोणामुळे आहे, का आहे आणि जे आहे ते असे का आहे, या प्रश्‍नांवर ते अखेर येऊन थांबतात. भावविभोर लेखन करणारे मर्ढेकर परमेश्‍वराकडे दान मागताना संत ज्ञानेश्‍वरांच्या पसायदानाचाच जणू उत्तरार्ध लिहिताना दिसतात. सर्वश्रेष्ठ परमेश्‍वराकडे काय मागितले पाहिजे, याचाही आदर्श वस्तुपाठ घालून देतात. कविता लिहिताना आशयाचा तोल सांभाळण्याची जबाबदारी कवीची असली तरी काव्याची देणगी देणारा सर्वश्रेष्ठ परमेश्‍वरही त्यासाठी तितकाच जबाबदार आहे, असे ते मानत…

भंगुं दे काठिण्य माझें,
आम्ल जाऊं दे मनीचे;
येउं दे वाणींत माझ्या,
सूर तुझ्या आवडीचे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)