पर्थ – अष्टपैलु मार्कस स्टोनिसने केलेल्या वादळी फलंदाजीच्या जोरावर यजमान ऑस्ट्रेलियाने येथे सुरु असलेल्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत मंगळावारी झालेल्या लढतीत श्रीलंकेचा 7 गडी राखून पराभव केला.
श्रीलंकेने विजयासाठी दिलेले 158 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने 16.3 षटकांत केवळ 3 गडी गमावून पार केले. ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. त्यांचा धडाकेबाज सलामीवीर फलंदाज डेव्हीड वॉर्नर अवघ्या 11 धावांवर परतला. कर्णधार ऍरन फिंचने मात्र, संयमी खेळी केली. त्याने मिशेल मार्शसह डाव सवरताना संघाचे अर्धशतक फलकावर लावले.
मार्श वेगाने धावा जमवण्याच्या प्रयत्नात 1 चेंडूत 1 चौकार व 1 षटकार फटकावताना 17 धावा करुन बाद झाला. त्यानंतर आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने आक्रमक खेळी केली. मात्र, तो देखील स्थिरावल्यावर 12 चेंडू 2 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 23 धावा करुन बाद झाला. यावेळी खेळपट्टीवर दाखल झालेल्या स्टोनिसने सामन्याचे चित्रच पालटून टाकले.
A sensational fifty from Marcus Stoinis powers Australia to a spectacular win 👊🏻#AUSvSL | #T20WorldCup | 📝: https://t.co/pRsIxO6aDz pic.twitter.com/urcZqczGAW
— T20 World Cup (@T20WorldCup) October 25, 2022
त्याने वादळी फलंदाजी करताना श्रीलंकेच्या गोलंदाजीचा पालापाचोळा केला. त्याने अवघ्या 18 चेंडूत 4 चौकार व 6 षटकारांची आतषबाजी करत नाबाद 59 धावांची खेळी केली. फिंच 42 चेंडूत केवळ 1 चौकार फटकावत 31 धावांवर नाबाद राहिला. या जोडीने चौथ्या गड्यासाठी 69 धावांची अखंडीत भागीदारी केली व संघाला विजय प्राप्त करुन दिला.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरन फिंचने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा श्रीलंकेला फलंदाजी दिली. श्रीलंकेने 20 षटकांत 6 गडी गमावून 157 धावा उभारल्या. त्यांच्या डावाची सुरुवात फारशी समाधानकारक झाली नाही. त्यांचा भरात असलेला सलामीवीर कुशल मेंडीस लवकर बाद झाला. त्यानंतर पाथुम निसांकाने धनंयज डीसील्व्हासह डाव सावरताना 69 धावांची भागीदारी केली.
डीसील्व्हा स्थिरावलेला असताना 26 धावांवर बाद झाला. एका बाजूने समर्थपणे फलंदाजी करत असलेला निसांकाही तंबूत परतला. त्याने 45 चेंडूत 2 चौकारांसह संयमी 40 धावांची खेळी केली. भानुका राजपक्षे व कर्णधार दासुन शनाका यांनी साफ निराशा केली. त्यावेळी चरिथा असालंकाने संघाच्या डावाची सुत्रे आपल्या हाती घेतली.
त्याने चामिका करुणारत्नेसह संघाला दीडशतकी धावसंख्या उभारून दिली. असालंकाने 25 चेंडूंचा सामना करताना 3 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 38 धावांची खेळी केली. तर करुणारत्नेने नाबाद 14 धावा करताना 2 चौकार फटकावले. ऑस्ट्रेलियाने 23 अवांतर धावांची रसदही श्रीलंकेला पुरवली.
संक्षिप्त धावफलक –
श्रीलंका – 20 षटकांत 6 बाद 157 धावा. (पाथुम निसांका 40, धनंजय डीसील्व्हा 26, चरिथा असालंका नाबाद 38, चामिका करुणारत्ने नाबाद 14, अवांतर 23, ग्लेन मॅक्सवेल 1-5, मिशेल स्टार्क 1-23, ऍश्टन ऍगर 1-25, जोश हेझलवूड 1-26, पॅट कमिन्स 1-36).
ऑस्ट्रेलिया : 16.3 षटकांत 3 बाद 158 धावा. (ग्लेन मॅक्सवेल 23, मिशेल मार्श 1, मार्कस स्टोनिस नाबाद 59, ऍरन फिंच नाबाद 31, धनंजय डीसील्व्हा 1-18, चामिका करुणारत्ने 1-20, महिश तक्षिणा 1-23).