मावळच्या प्रचाराची सूत्रे मराठवाड्याच्या हाती

आयात केले नेते ः आमदार सतीश चव्हाण, राणा पाटील, दिलीप सोपलही तळ ठोकून 

पुतण्यांची पार्थना साथ
महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय नेत्यांच्या पुतण्यांना मोठे महत्व आहे. विशेष म्हणजे मोठ्या मोठ्या नेत्यांच्या पुतण्यांना राष्ट्रवादीने आपले केले आहे. आता या पुतण्यांची साथही पार्थ पवार यांना मिळत आहे. शरद पवार यांचे पुतणे आणि पार्थ यांचे वडील अजित पवार, बीडचे दिग्गज नेते जयदत्त क्षिरसागर यांचे पुतणे संदीप क्षीरसागर हे पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून ठाण मांडून बसले आहेत. तसेच स्व. गोपीनाथ मुंढे यांचे पुतणे धनंजय मुंढेही मावळात प्रचारसभा घेऊन आपली तोफ डागत आहेत.

 

स्थानिकांमध्ये नाराजी
मावळ लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच मावळ मतदारसंघातील राष्ट्रवादीचे काही मोजके पदाधिकारी व नगरसेवक निष्ठेने काम करीत असल्याचे चित्र पहायला मिळत होते. मात्र, मागील काही दिवसांपासून मराठवाड्यातील नेतेमंडळीने शहरी भागातील प्रचाराची सूत्रे हातात घेतल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थनिक पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे दिसत आहे. पदाधिकारी उघडपणे नाराजी बोलून दाखवत नसले तरी कित्येकांच्या कृतीतून नाराजी व्यक्‍त होत असल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत.

जबाबदाऱ्या दिल्या वाटून
मराठवाड्यातून आलेल्या नेतेमंडळीला विविध जबाबदाऱ्या वाटून दिल्या आहेत. पनवेल भागात उस्मानाबादच्या नेते मंडळीला जबाबदारी देण्यात आली असून या नेत्यांनी आपल्या मतदारसंघातील स्वतंत्र यंत्रणा येथे आणून कार्यान्वित केली आहे. तर आमदार राहुल मोटे, आमदार दिलीप सोपल, संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडीत यांनाही आपल्या भागातील मतदारांच्या बैठका, सभा, मतदारापर्यंत पोहचण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

पिंपरी  – संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मावळ लोकसभा मतदार संघावर झेंडा फडकवण्यासाठी आघाडी आणि युतीकडूनही जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. शहरी आणि ग्रामीण भागाचा समावेश असलेल्या या मतदारसंघात मराठवाड्याबरोबरच पश्‍चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. मराठवाड्यातील या मतदारांना आपलेसे करण्यासाठी राष्ट्रवादीने व्यूहरचना केलेली दिसून येत आहे. तसेच मावळ मतदार संघातून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार निवडणूक लढवत असल्याने राष्ट्रवादीसाठी मावळातील लढत सर्वांत प्रतिष्ठेची झाली आहे. मराठवाड्यातील आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणचे मतदान संपल्यानंतर तेथील नेते मंडळींना राष्ट्रवादी कॉंग्रेसने मावळ लोकसभा मतदार संघात आणून बसवले आहे. मावळतल्या प्रचाराची धुरा या नेत्यांनी हाती घेतल्याने स्थानिक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मात्र काहीसी नाराजी पसरली असल्याचे दिसत आहे.

शिवसेनचा अभेद्य किल्ला म्हणून ओळख असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात यावेळी पहिल्यांदाच शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार लढत होत आहे. शिवसेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या मुलाला निवडून आणण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील राष्ट्रवादी कामाला लागल्याचे दिसत आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांना काहीसे बाजूला करत किंवा आयात केलेल्या नेत्यांसोबत जोडून देत राष्ट्रवादी शेवटच्या दिवसांमध्ये जोर लावत आहे. पिंपरी-चिंचवड आणि पनवेल या शहरी भागात मराठवाड्यातील तसेच पश्‍चिम महाराष्ट्रातल्या सोलापूर तसेच बार्शी येथील मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. विदर्भातील मतदारही मोठ्या प्रमाणात आहेत.

मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील सोलापूर, माढा येथील निवडणुका संपल्यानंतर तेथील नेते मावळ लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी आले आहेत. काही नेत्यांनी तर पिंपरी-चिंचवड आणि पनवेल शहरात ठिय्या मांडून प्रचाराची सर्व सूत्रेच आपल्या हाती घेतल्याचे चित्र दिसत आहेत. दिग्गजाची फळी दाखल आपल्या मतदारसंघातील मतदान झाल्यानंतर दोन दिवसातच राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण, आमदार राहुल मोटे, बीडचे संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित, उस्मानाबादचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील, आमदार राहुल मोटे, मल्हार पाटील, माजी मंत्री दिलीप सोपल, माढ्याचे उमेदवार संजय शिंदे यासारख्या दिग्गज नेत्यांची फळी दाखल झाली आहे. या सर्वांवर राष्ट्रवादीने विशेष जबाबदारी टाकली आहे. हे नेते मंडळी आपल्या भागातील मतदारांच्या बैठका घेवून त्यांना आपले करीत आहेत. या नेत्याच्या दिमतीला स्थानिक नगरसेवक आणि पदाधिकारी देण्यात आले आहेत. त्यामुळे, मराठवाड्यातील ही नेतेमंडळी थेट मतदारांपर्यंत पोहचून विजयाचे आवाहन करीत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)