मराठी नाट्यसंगीत शासनदरबारी दुर्लक्षित

रसिकांच्या ‘मर्मबंधातील ठेव’ आठवणीत राहणार का?

– कल्याणी वाघमारे

-Ads-

पुणे – मराठी नाटकांची सुरूवात संगीत रंगभूमीपासूनच झाली. “संगीत रंगभूमी’ हा मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ मानला जातो. अनेक दिग्गज नाटककार, दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक, अभिनेते-गायकांनी मराठी संगीत रंगभूमी समृद्ध केली आणि आपल्या प्रतिभा-कर्तृत्वाचा ठसा उमटवला. मराठी संगीत रंगभूमी आणि नाटयपदे ही मराठी रसिकांच्या ‘मर्मबंधातील ठेव’ आहे.

सध्या संगीत रंगभूमी बिकट अवस्थेत असून शासनाचे सांस्कृतिक धोरणही कमालीचे उदासीन आहे. संगीत नाटकांसाठी काम करणाऱ्या संस्थांना सन 2013 नंतर शासनाकडून अनुदानच मिळालेले नाही. याबाबत विविध संस्थांनी सांस्कृतिक मंत्र्याची भेट घेतली, तरीही काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता महाराष्ट्रातील प्रतिभाशाली असलेली संगीत नाटकाची परंपरा लोप होण्याच्या मार्गावर आहे.

एकीकडे संगीत नाटकाची अविरत असलेली परंपरा टिकविण्यासाठी नाट्यप्रेमी आणि नाट्यसंस्थाकडून प्रयत्न होत असताना शासन मात्र याबाबत गाफील असलेले दिसून येत आहे. नाट्य-संस्कृतीच्या बाबतीत सरकारची भूमिका उदासीन आहे. विशेष म्हणजे, दर पाच वर्षांनी सरकार बदलते. पण, ही अनास्था मात्र कायम आहे. त्यात यत्किंचितही बदल नाही.

संगीतनाटकाच्या या दशेबाबत नुकत्याच मुलुंड येथे झालेवल्या नाट्यसंमेलनातही या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली. संमेलनाध्यक्ष कीर्ती शिलेदार यांनी संगीत नाटकाची परंपरा आबाधित ठेवण्यासाठी संगीत नाटकात कालानुरूप काही बदलही केले आहे. यात वेळेचा बदल असून प्रामुख्याने सात-आठ तास चालणारी नाटके चार-पाच तासांची केली आहेत. मात्र, शासनाकडून अनुदान न मिळाल्याने या संस्थावर आर्थिक भार पडत आहे. तो न परवडणारा आहे.

कालानुरूप संगीत रंगभूमीचे महत्त्व हळूहळू लोप पावत जाऊन संगीत नाटके सादर होण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. मात्र, तरीही संगीत नाटकांच्या प्रयोगांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. संगीत रंगभूमीचे जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने काही संस्था आजही प्रयत्नशील असून जुनी संगीत नाटके पुन्हा एकदा नव्याने रंगभूमीवर सादर करत आहेत. मात्र सरकारकडून मिळणारे अनुदान गेल्या काही वर्षात न मिळाल्याने नाटकसंस्थांवर आर्थिक भार येत आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)