मराठीची बोलू कौतुके…

आज मराठी भाषा दिन उत्साहात साजरा होत आहे. संपूर्ण देशात जसा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची संस्कृती प्रेरणादायी आहे तशी मराठी भाषा देखील. संत ज्ञानेश्‍वर म्हणतात,

माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन ।।

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तर एकीकडे कवी सुरेश भट म्हणतात,
”लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

आपली भाषा म्हणून मराठीचा प्रत्येक महाराष्ट्रवासीयाला अभिमानच.. पण याच मराठी भाषेवर सुरु असलेले अतिक्रमण आणि त्याला जबाबदार पण आपणच याचे फार दु:ख वाटते. गेली अनेक वर्षात विविध भाषेतील शब्द आपण मराठी भाषेत सहज उच्चारू लागलो आहोत. हे शब्द आता मराठी भाषेतील झाले. मराठी राजभाषेतून विविध व्यवहार व्हावेत म्हणून शासन पुढाकार घेत असतानाच दुसरीकडे मराठी शाळांवर मात्र गडांतर आणण्याचे काम देखील शासन पद्धतशीरपणे करत आहे.

काही इंग्रजी शाळा तर मराठी संस्कृतीचे दर्शन देखील मुलांना होऊ देत नाहीत. मराठी संस्कृती ही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ‘ट्रॅडिशनल डे’ पुरती मर्यादित आहे. अनेक इंग्रजी शाळेत शिक्षण घेत असलेल्या मुलांना धड मराठी बोलता येत नाही हि वस्तुस्थिती निर्माण होत आहे. घरी देखील पालक मुलांजवळ त्याच भाषेत बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. पालक मात्र मुकाट्याने गप्प आहेत. शासन देखील या इंग्रजी शाळांना पाठबळ देण्याचे काम करत आहे. आपण देखील मराठी शाळांकडे पाठ फिरवून आपल्या मुलांना कॉन्वेंट, इंग्रजी शाळेत टाकू लागलो आहोत. मला आश्‍चर्य वाटते खेडेगावातील ज्या पालकांनी त्याच मराठी शाळेत शिक्षण घेऊन नोकरी, व्यवसाय सुरु केले ते ग्रामीण भागातील पालक देखील आपल्या मुलांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या मागे आहेत.

हल्ली ग्रामीण भागात इंग्रजी भाषा बोलायला आली म्हणजे खूप हुशार असं समजलं जातं. त्यामुळे पालक सुद्धा मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवताना दिसतात. दुर्दैवाने राज्यसरकारला गुणवत्ता खालावल्याने पट संख्या कमी झाल्यामुळे राज्याच्या ग्रामीण भागातील तेराशे शाळा बंद करण्याचा निर्णय राज्यसरकारला घ्यावा लागला. मुंबई सारख्या शहरात फिरताना मराठी भाषिक देखील सहजपणे हिंदीतच विचारणा करत असतो हे चित्र नवीन नाही. आज कोणत्या व्यक्तीला शुद्ध मराठी बोलायला सांगितले तर त्याला दोन वाक्‍य नीट बोलता येणार नाहीत. अगदी आपण बसच्या कंडक्‍टरला म्हणतो दोन तिकीट द्या पण अनेकांना तिकीटाला ‘हाशील’ म्हणतात हे सुद्धा माहिती नाही.गेल्या कांही वर्षात हा बदल झपाट्याने वाढला आहे. निमंत्रण पत्रिका देखील इंग्रजी भाषेत छापण्याचा कल वाढला आहे. मराठी हि आपली बोली भाषा असताना देखील सुशिक्षित लोकं याबाबतीत अधिक पुढाकार घेताना दिसत आहेत.

आपणच आपली बोली आपली भाषा सांभाळली पाहिजे. जपली पाहिजे. तरच पुढील पिढीला मराठी आणि मराठी भाषा संस्कृती ज्ञात होईल…मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..!

– आकाश देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)