मराठी भाषा दिन- …तरच होईल अमृतदायिनी मराठीचा विकास

डॉ. सुभाष राठोड

जोपर्यंत शिक्षणात, दैनंदिन व्यवहारात, प्रशासनात, विज्ञान तंत्रज्ञान, कायदा इत्यादी क्षेत्रांत ज्ञानभाषा म्हणून जोपर्यंत मराठी भाषेला स्थान मिळत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने अमृतदायिनी मराठीचा विकास होणार नाही. विज्ञान, तंत्रज्ञान, कायदा, शिक्षण, उद्योग, संवाद हे ज्यावेळी एकाच भाषेतून होतील त्याच दिवशी मराठी ही खऱ्या अर्थाने ज्ञानभाषा होईल. त्यादृष्टीने मराठीकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहून तशी कृती करायला हवी. नुसती मराठी अस्मितेची भाषणे देऊन मराठी अभिमान गीत गाऊन मराठी ज्ञानभाषा होणार नाही!

“माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा।
तिच्या संगाने जागल्या
दऱ्याखोऱ्यातील शिळा।’
– फादर स्टिफेन्स

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राजभाषा मराठीचा सन्मान म्हणून दरवर्षी 27 फेब्रुवारीला आपण “मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करतो. “ज्ञानपीठ’ विजेते, विख्यात कवी, नाटककार, कादंबरीकार, मराठी साहित्याचा मानदंड विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांना 1987 साली त्यांच्या एकूण साहित्यिक कामगिरीचा गौरव म्हणून 23 वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने त्यांचा जन्मदिवस “मराठी भाषा गौरव दिन’ जाहीर केला.

भाषा हे मानवाला मिळालेले एक वरदान आहे. जिच्यामुळे माणूस निसर्गापासून, इतर प्राण्यांपासून वेगळा ठरला आहे. आपल्या मनातील भावभावना, विचार व्यक्‍त करण्याचे साधन म्हणजे भाषा. अमृतदायिनी मराठी ही आपली मातृभाषा तिच्याबद्दल स्वतःला अभिमान असणे साहजिकच आहे. आपली “मराठी अमृतातेही पैजा जिंके’ अशी श्रीमंत व प्रभावी आहे. संतांची कीर्तने, भजने, भारुडे इत्यादींनी ती सजली आहे. अनेक जाती, धर्म, वर्ग यांना तिने आपलेसे केले. आपली मराठी संस्कृत भाषेतून विकसित झाली. तिला एक हजारहून अधिक वर्षांचा इतिहास आहे. तिची सर्वांत प्राचीन लिखित रूपं आपणास जुन्या मूर्ती, शिलालेख, ताम्रपट व प्राचीन वाङ्‌मयातून आढळतात. आजपर्यंत मराठी भाषा अनेक परकीय भाषांच्या संपर्कात आली. तिने अरबी, फारसी, इंग्रजीसारख्या परकीय भाषांचे आक्रमण पचवले, ती आज 21 व्या शतकात समर्थपणे आपल्यासमोर उभी आहे.

भारतातील एकूण लोकसंख्येपैकी 16% लोक महाराष्ट्रात राहतात. देशाच्या 125 कोटी लोकसंख्येपैकी 12 कोटी मराठी भाषिक महाराष्ट्रात राहतात. महाराष्ट्राबाहेर बडोदा, इंदौर, गोवा, मध्य प्रदेश तसेच सिंगापूर, सॅनफ्रान्सिस्को, टोरॅन्टो, कॅनडामधील काही शहरे मिळून सुमारे दीड कोटी मराठी लोक राहतात. मराठीच्या अहिराणी, कोकणी, मालवणी, वऱ्हाडी, पुणेरी, कोल्हापुरी, मराठवाडी अशा खास बोलीभाषाही प्रचलित आहेत. त्यांना खास स्वतःचा चेहरा, इतिहास व भूगोलही आहे.

मराठी भाषेचा प्रचार, प्रसार करणे म्हणजे इतर भाषांना विरोध करणे नव्हे; तर मराठी ही आपली मायबोली असल्याने ती जिवंत ठेवणे, जगवणे. जगभरातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, कॉम्प्युटर्स, इंटरनेट, मोबाइल, सोशल मीडिया अशा आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित माध्यमांवर मराठी भाषा लिपीस्वरूपात उपलब्ध करून दिली जात आहे.

आधुनिक काळात विज्ञान व तंत्रज्ञान इंग्रजीतून उपलब्ध झाल्याने इंग्रजीला ज्ञानभाषेचा दर्जा प्राप्त झाला कॉम्प्युटर, इंटरनेटसारख्या माध्यमातही इंग्रजीचाच प्रभाव असल्याने तिच भाषा सर्वात जास्त प्रचलित आहे. व्यवसाय आणि नोकरीच्या संधी याच भाषेतून शिक्षण घेतलेल्यांना मिळत असल्याने जगभरातील तरुणाईचे इंग्रजीबाबत आकर्षण जास्तच वाढत आहे. परिणामी इतर भाषांना दुय्यम स्थान मिळून त्या हळूहळू नष्ट होणार की काय, अशी भीती व्यक्‍त होत आहे. या भाषा लयाला जाताना आपल्याबरोबर त्या देशाची संस्कृती, अनुभवसिद्ध पारंपरिक ज्ञान, वाङ्‌मय, कला व साहित्य अशा अनेक गोष्टीही लयाला जाण्याची भीती नाकारता येत नाही. तमाम मराठी बांधवांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यासाठी “मराठी भाषा गौरव दिन’ सारखे उपक्रम आवश्‍यकच आहे.

आवश्‍यक तिथे इंग्रजी भाषा जरूर शिकावी. कौटुंबिक, शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक स्तरावर मराठी भाषेचा आवर्जून वापर करावा. शालेय शिक्षण व उच्च शिक्षणासाठी संशोधनाद्वारे आधुनिक ज्ञान व माहिती मराठीत मांडून मराठीला उच्च शिक्षणातही स्थान मिळायला हवे. विज्ञान, तंत्रज्ञान, उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा, उद्योगजगताशी मराठी भाषा जोडली गेली तरच ती खऱ्या अर्थाने विकसित होईल. आजच्या काळात इंटरनेटवर मराठी भाषा व साहित्यासंबंधी अनेक संकेतस्थळे सुरू झालेली आहेत, ही आनंदाची बाब आहे. आता युनिकोड सुविधेमुळे थेट मराठी देवनागरी लिपीचा वापर करता येऊ लागलेला आहे. मराठीत शिवाजी, युनिकोड, कृतिदेव, किरण, मंगल, लेखणी इत्यादी मराठी मुद्राक्षरे (फॉन्टस) उपलब्ध आहेत, ही निश्‍चितच कौतुकाची बाब आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी 17 व्या शतकात मराठी भाषेवरील धोका ओळखून “राज्यव्यवहार कोशा’ची निर्मिती करून मराठीवरील अरबी, फारसी, तुर्कीसारख्या भाषांचे आक्रमण थोपविले होते. पैठण येथील सातवाहन राजवटीपासून मराठीचा प्रशासनात सर्वप्रथम वापर सुरू झाला. देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली. मराठी साहित्यात मराठवाड्याचे योगदान महत्त्वाचे आहे. शके 1110 मध्ये आद्यकवी मुकुंदराज या कवीने “विवेकसिंधू’ या काव्यग्रंथाची रचना मराठीत केली. मराठीतील आद्य कवयित्री महदंबेचे धवळे आजही वाचले जाते. शके 1212 मध्ये ज्ञानेश्‍वरांनी “ज्ञानेश्‍वरी’ची रचना केली. छ. शिवाजी महाराज यांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली; तर पेशव्यांनी त्याचा विस्तार केला. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी इंग्रजी भाषेतील अनेक शब्दांना दिलेले मराठी पर्यायी शब्द आजही प्रचलित आहेत.

वर्ष 1947 मध्ये आपला भारत स्वतंत्र झाला. नंतर भाषावार प्रांतरचना झाली. महाराष्ट्र हा मराठी भाषिकांचा प्रदेश बनला. वर्ष 1960 मध्ये मराठीला राजभाषेचा दर्जा मिळाला. सुदैवाने महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाणांसारखे सुसंस्कृत, मराठी भाषेविषयी प्रेम असणारे पहिले मुख्यमंत्री लाभले. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक यांच्या काळात मराठी भाषा विकासाचा संस्थात्मक पाया घातला गेला. चव्हाण यांनी प्रशासनाच्या भाषेची जडणघडण करण्यासाठी भाषातज्ज्ञांचे भाषा सल्लागार मंडळ, भाषा संचालनालय, महाराष्ट्र साहित्य व संस्कृतीमंडळ, विश्‍वकोश निर्मिती मंडळ विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळ, अशा अनेक संस्था स्थापन केल्या. मराठी भाषा शुद्धलेखनाच्या नियमात सुसूत्रता आणण्यासाठी त्यांनी महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांच्या मदतीने महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माध्यमातून मराठी शुद्धलेखनाचे नियम तयार करवून घेत, त्याला राजमान्यताही दिली. वर्ष 2010 साली मंत्रालयात स्वतंत्र मराठी भाषा विभागही स्थापन करण्यात आला. मराठी साहित्यविषयक आजपर्यंत चार विश्‍वसाहित्य संमेलने, 92 साहित्य संमेलने, 99 नाट्य संमेलने पार पडलेली आहेत. आता यानिमित्ताने मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याची प्रक्रिया पूर्ण होवो, ही सदिच्छा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)