प्रभात मराठी नाट्य समीक्षण : वंचितांचा आक्रोश ‘अनफेयर डिल’

58 वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा


लेखक-भगवान हिरे; दिग्दर्शक-अजय घोगरे

-Ads-

वंचित, निराधार, तसेच एखाद्या सामाजिक समस्येची सोडवणूक करण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्था सुरू झालेल्या आहेत. या संस्था विविध सामाजिक प्रश्‍न सोडविण्यात अनेक अंशी यशस्वी होत आहेत. मात्र अनेकवेळा यातील बहुतांशी संस्थाच ज्यांच्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी सुरू करण्यात आल्या, त्यांचेच शोषण करताना दिसून येतात.

यात देहविक्रय करणाऱ्या महिलांसाठी काम करणाऱ्या काही संस्थांचाही समावेश आहे. त्यातून या वंचितांची कशी वाताहत होते व ते समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी कसे धडपडतात, याचा वेध घेण्याचा प्रयत्न श्रीरामपूर येथील कर्णेज ऍकॅडमीच्या अनफेअर डिल या नाटकातून करण्यात आला आहे.

निशाताई (प्रा. संगीता परदेशी) एका सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा. त्यांच्या कार्यालयात अरविंद (दिप्तेश विसपुते), कविता (डॉ. रुचिका कासार), अजय (धनंजय बडाख) यांच्यातील संवादाने नाटकाचा पडदा उघडतो. यावेळी अरविंद एका राजकीय प्रचारफेरीमध्ये आपल्या संस्थेच्या महिलांचा सहभाग नको, असा विचार मांडतो. मात्र आपल्या स्वार्थापायी निशाताई महिलांना प्रचारफेरीत पाठवतात. तेथूनच अरविंद व निशाताई यांच्यातील संघर्ष सुरु होतो. अरविंद आपल्या तत्वांशी प्रामाणिक असलेला सच्चा समाजसेवी तरुण. त्याला वंचित महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायाचे आहे. मात्र निशाताई सर्वच आघाड्यांवर त्याला विरोध करते.

अरविंदचा विरोध संपावा, यासाठी अनेक प्रयत्न होतात. मात्र अरविंद आपल्या कामाशी पूर्णपणे एकनिष्ठ असतो. तो झुकत नाही, हे पाहून शानो (कावेरी फटांगरे) या वेश्‍या व्यवसाय करणाऱ्या तरुणीला निशाताई अरविंदकडे पाठवते. शानो अरविंदला लग्नाची गळ घालते. अरविंदही तिचा स्वीकार करतो. शानोला हिस्टेरिया नावाचा मानसिक आजार जडलेला असतो. तिची शारीरिक भूक भागत नाही. अनेक पार्टनर सोबत संबंध आल्याने कदाचित तिला ही सवय जडलेली असावी. आणि तिच्या मानसिक ताणतणावामुळे ती अशाप्रकारचे वर्तन करत असावी.

अरविंदने एका वेश्‍येसोबत विवाह केला, ही बाब सोसायटीमधल्या लोकांना रुचत नाही. तिथेही विरोध होतो.अनेक घटनांनंतर पुढे निशाताईचा शानोच खून करते. एकप्रकारचा सूडच उगवते. मात्र हीच शानो सामाजिक तत्वज्ञान शिकवत जाते, अरविंद व कविता यांना जोडणारा दुवा बनते.

ती आली, तिने पाहिलं आणि तिने जिंकलं आणि प्रेक्षकांना आपल्या प्रेमात पाडलं, असच कावेरी फटांगरेच्या बाबतीत म्हणावं लागेल. संथ सुरू असलेल्या नाटकात शोनोच्या (कावेरी फटांगरे) प्रवेशाने गती मिळाली. सहज अभिनयाने प्रेक्षकांसमोर शानो लक्‍ख उभी केली. तिची संवादफेक, देहबोली, उत्तम होती. दिप्तेश विसपुते यांनी सच्चा समाजसेवी कार्यकर्ता चांगला रंगवला. शांत, संयमी तरुण चांगला वठवला आहे. कावळे आणि डोमाळे यांना घरातून हाकलून लावतानाच्या प्रसंगात दिप्तेश यांनी समयसूचकता दाखवली.

प्रा. संगीता परदेशी यांनी खलनायकी भूमिकेला योग्य न्याय दिला.त्यांच्या बेरकी नजरेतून आणि संवादातून खलनायकी समाजसेविका दिसत होती. कविताची भूमिका साकारणाऱ्या डॉ. रुचिका कसार यांनी आपली भूमिका योग्यरित्या सांभाळली. मात्र काही प्रसंगात त्या संवाद विसल्याचे जाणवले. हितेन धाकतोडे, मितेश ताके, सायली साळुंके, नानासाहेब कर्डिले, अनुज नगरकर, मयूर इनामके, प्रा. अशोक कर्णे यांना नाटकात फारसा वाव नव्हता.

प्रा. अशोक कर्णे यांचे नेपथ्य चपखल. मयूर वाकचौरे यांचा संगीताचा वापर निरस वाटला. प्रकाश ढोणे यांनी प्रकाशयोजनेत केलेले नवनवीन प्रयोग स्तुत्य. निशाताईला मारतानाचा प्रसंग पांढऱ्या पडद्यावर दाखवताना त्यांनी आपले कौशल्य पणाला लावले. स्नेहा कुलकर्णी यांनी रंगभूषेची, तर डॉ. वृषाली वाघुंडे यांनी वेशभूषेची जबाबदारी सांभाळली.

-अमीन पटेल,नगर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)