मराठा समाजाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “ठिय्या’ आंदोलन

आंदोलकांनी घेतली आक्रमक भूमिका : राष्ट्रगीताने आंदोसनाचा झाला समारोप

पुणे – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुरक्षारक्षकांच्या केबीनच्या काचा फोडल्या. दरम्यान दुपारी एक वाजता ठिय्या आंदोलन संपले आहे, असे जाहीर करूनही काही आंदोलनकर्ते कोणाचेच ऐकत नव्हते. त्यामुळे काही आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले. दरम्यान पोलिसांनी याठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता.

-Ads-

मराठा क्रांती मोर्चाच्या पुणे जिल्हा समन्वयकांनी एसएसपीएमएस येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून आंदोलनाला सुरूवात करण्यात आली. सकाळी आंदोलकांनी दुचाकी रॅली काढली. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन पुकारले होते. सकाळी नऊ वाजल्यापासूनच जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलनकर्ते जमा होण्यास सुरूवात झाली होती. साडेअकराच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठी गर्दी जमा झाली. आंदोलकांमध्ये तरूण आणि महिलावर्गाचा मोठा सहभाग होता. मोर्चाचे समन्वयक यावेळी उपस्थित होते.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी “जय भवानी, जय शिवाजी’ आणि “एक मराठा, लाख मराठा’ असा घोषणा दिल्या. दुपारी एक वाजता समन्वयकांनी आणि आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना आपल्या मागण्याचे निवेदन दिले. त्यानंतर राष्ट्रगीताने आंदोलनचा समारोप झाला. मात्र, जिल्हाधिकारी खाली का आले नाहीत? अशी भूमिका काही आंदोलनकर्त्यांनी घेतली. त्यानंतर काही आंदोलनकर्त्यांनी प्रवेशद्वारावरून उड्या घेत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बंदोबस्तासाठी उभ्या असलेल्या पोलिसांवर बूट आणि पाण्याच्या बाटल्या फेकल्या. प्रवेशद्वाराजवळील सुरक्षारक्षकाच्या खिडकीच्या काचा फोडल्या. त्यानंतर मोर्चाच्या समन्वयकांनी या आंदोलकांना समजाविण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांना शांत करण्यासाठी पुन्हा राष्ट्रगीत झाले. मात्र, राष्ट्रगीतानंतर आंदोलकांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला.

पोलीस प्रशासन, निवासी जिल्हाधिकारी विजयसिंग देशमुख, मराठा आंदोलकाच्या समन्वयकांनी आंदोलकांना समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांनी कोणाचेही ऐकले नाही. त्यानंतर स्वतः जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी आंदोलक तरूणांशी चर्चा केली. त्यांच्या मागण्या काय आहेत, हे जाणून घेतले. नेहमी शांततेच्या मार्गाने झाले आहे. आपले निवेदन मिळाले असून ते शासनापर्यंत पोहचवू. मुख्यमंत्र्यांनी आपल्या मागण्यांबाबत कालबद्ध कार्यक्रम दिला आहे, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. तुमच्या सर्व मागण्या शासनापर्यंत पोहचवू, असेही त्यांनी सांगितले. मात्र, आंदोलकांनी त्यांचेही ऐकले नाही. आम्हाला आत्ताच्या आत्ता आरक्षण द्या, अशी भूमिका घेत आंदोलक जास्त आक्रमक झाले होते.

मुख्यमंत्र्यांच्या नावाचा फलक तोडला
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरून काही आंदोलकांनी उड्या मारून आत प्रवेश केला. त्यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्‌घाटन झाल्याचा फलक तोडला.

पत्रकारांना धक्‍काबुक्‍की
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनादरम्यान काही आंदोलक आक्रमक झाले होते. त्यांनी कार्यालयात घुसून गदारोळ करण्यास सुरूवात केली. याचे चित्रीकरण करणाऱ्या पत्रकारांना काही आंदोलकांनी धक्‍काबुक्‍की केली. तसेच एका पत्रकाराचा मोबाईल हिसकावून घेत त्याच्या मोबाईलमधील सर्व व्हिडिओ आणि फोटो डिलिट केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)