मराठा आंदोलनातील दगडफेकीत पाच पोलीस जखमी

192 जणांना अटक : विविध पोलीस ठाण्यांत 20 गुन्हे दाखल

पुणे – मराठा आरक्षण मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये शहराच्या वेगवेगळ्या भागात तोडफोड तसेच पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या 192 जणांना पोलिसांनी अटक केली. आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत 5 पोलीस जखमी झाले होते. त्यापैकी एका पोलिसाला गंभीर दुखापत झाली आहे. ही कारवाई बंडगार्डन, कोथरूड, डेक्कन आदी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत करण्यात आली. यामध्ये 20 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मराठा आरक्षण मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बंदला गुरूवारी दगडफेक व पोलिसांवर हल्ल्याने गालबोट लागले. चांदणी चौक, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात ठिय्या आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी पोलिसांना धक्काबुक्की केली. तर, चांदणी चौकात पोलिसांवर दगडफेक केली. अखेर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पिटाळून लावले. डेक्कन येथील खंडुजीबाबा चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले. पिंपरीतील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. आंदोलकांनी पीएमपी बस तसेच काही दुकानांवर दगडफेक केली.

शहराच्या वेगवेगळ्या भागात हिंसक आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांनी 192 जणांना अटक केली. याप्रकरणी बंडगार्डन, सिंहगड, येरवडा, कोथरूड पोलीस ठाण्यात वेगवेगळे 20 गुन्हे दाखल करण्यात आले. त्यापैकी 10 गुन्हे कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. दंगल करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, सरकारी कार्यालयासमोर दहशत निर्माण करणे (कलम 7 क्रिमिनल लॉ अॅॅमेंडमेंट अॅॅक्‍ट) या कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत 5 पोलीस जखमी झाले आहेत.

78 जणांना कोठडी
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करताना तोडफोड केल्याप्रकरणात बंडगार्डन पोलिसांनी 80 जणांना अटक केली होती. त्यातील 2 अल्पवयीन होते. यातील 78 जणांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. यात पाच महिलांचा समावेश आहे. या पाच महिलांतर्फे जामीन मिळावा म्हणून अर्ज करण्यात आला होता. तो अर्ज न्यायालयाने फेटाळला. तर, वारजे पोलिसांनी अटक केलेल्या 30 जणांना न्यायालयीन कोठडी रवानगी झाली. डेक्कन पोलिसांनी अटक केलेल्या 21 जणांची 15 हजार रुपयांच्या जामीनावर सुटका करण्यात आली.

मारहाणीची तक्रार
कोथरुड पोलिसांनी अटक केलेल्या 55 जणांपैकी, 50 जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर पाच जणांनी त्यांना मारहाण झाल्याची तक्रार केल्यामुळे त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यांना तपासणीसाठी ससून हॉस्पिटलला पाठविण्यात आले. चांदणी चौक येथे झालेल्या आंदोलनप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी आठ जणांना अटक केली असून त्यांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

केसेस मोफत लढविणार
पुणे जिल्हा बार असोसिएशन वतीने जाहीर केल्याप्रमाणे मराठा आंदोलनाच्या केसेस मोफत लढविण्यात येत आहेत. त्यानुसार शुक्रवारी पुणे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅॅड. सुभाष पवार, अॅॅड. समीर घाटगे, उपाध्यक्ष अॅॅड. भूपेंद्र गोसावी, अॅॅड. रेखा करंडे, सचिव अॅॅड. संतोष शितोळे, खजिनदार अॅॅड. प्रताप मोरे, अॅॅड. योगेश पवार, अॅॅड. नितीन झंजाड, अॅॅड. विजय शिंदे आणि अॅॅड. रवी पवार यांनी आंदोलकांच्या वतीने बाजू मांडली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)