मराठा आणि बहुजनांत फूट पाडण्याचा डाव

शरद पवार: मराठा आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न
मुंबई – मराठा आंदोलनाला बदनाम करून मराठा आणि अन्य बहुजन समाजात फूट पाडण्याचा डाव राज्यकर्ते, तसेच हितसंबंधी खेळत आहेत. मराठा समाजाला इतर समाजापासून वेगळे आणि एकाकी पाडण्याचा राज्यकर्त्यांचा प्रयत्न आहे, असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केला. राज्यकर्त्यांची ही योजना यशस्वी होऊ देता कामा नये. याची पक्की खूणगाठ आंदोलकांनी ठेवली पाहिजे. राज्यकर्त्यांच्या या खेळीला आंदोलकांनी बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या दोन आठवड्यापासून सुरु असलेल्या आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणाच्या पार्श्वभूमिवर शरद पवार यांनी आज एक पत्रक काढून त्यामध्ये राज्यकर्त्यांकडून मराठा समाजाला एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करतानाच मराठा आंदोलनकर्त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला.
मराठा आरक्षणाच्या मागणीला कोणाचीच हरकत नाही. परंतु, कोणताही पूर्वग्रह न ठेवता स्वच्छ मनाने तसेच राज्यघटनेने ज्यांना आरक्षण दिलेले आहे, त्याला धक्का न लावता मराठा आरक्षणाचा निर्णय झाला पाहिजे, असे पवार म्हणाले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हिंसा, जाळपोळ, दंगे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचे प्रकार सक्तीने टाळले पाहिजेत. आतापर्यंत शांततेने पार पडलेल्या मराठा आंदोलनाला सर्वसामान्य आणि बहुजनांचा पाठिंबा तसेच सदिच्छा मिळाल्या. त्यामुळे त्याला धक्का लागेल असा प्रकार होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन पवार यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मराठा समाज सर्वाधिक भूमिहिन
कुटुंबाच्या विस्तारानुसार जमिनीचे लहान-लहान तुकडे पडत गेल्याने शेती किफायतशीर राहिलेली नाही. यातून आलेल्या आर्थिक हालाखीमुळे पुरेसे शिक्षण नाही व नोकऱ्याही नाहीत, अशा दृष्टचक्रात तरूण सापडला आहे, असे सांगत शरद पवार यांनी गोखले अर्थ-राज्यशास्त्र संस्थेने शेतकरी आत्महत्यांच्या संदर्भात केलेल्या पाहणीत मराठा समाजाबद्दलची विदारक स्थिती मांडण्यात आली असल्याचा दाखला दिला. यामध्ये मराठा समाज सर्वाधिक म्हणजे 28 टक्के भूमिहिन आहेत. काठावरचे किंवा अत्यल्पभूधारक 53 टक्के, अल्पभूधारक 58 टक्के आणि जमीन असणारे 63 टक्के आहेत. त्याचप्रमाणे या जमिनींना हमखास पाणीपुरवठा नाही, त्यातूनच ही समस्या चिघळत गेली असल्याचे त्यांनी नमूद केले.

आंदोलनाने गुंतवणूक थांबेल, बेरोजगारी वाढेल
आरक्षण मागणीची पूर्तता तसेच आरक्षणाची अंमलबजावणी संदर्भात राज्य सरकार आणि विधिमंडळाची प्रक्रिया आवश्‍यक आहे. तसेच राज्यातील औद्योगिक क्षेत्राला आंदोलनाची झळ पोहचणार नाही याची काळजी घ्यायला हवी. अशा आंदोलनाने राज्यातील उद्योगधंद्यातील गुंतवणूक थांबेल आणि बेरोजगारीचा प्रश्न अधिक गंभीर होईल, याची जाणीव पवार यांनी करून दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)