#CWC19 : शतकी खेळीने रोहितच्या नावे अनेक विक्रम

बर्मिंगहॅम – बांगलादेशविरुद्धच्या महत्वाच्या सामन्यामध्ये भारताचा सलामीवीर रोहित शर्माने शानदार शतकी खेळी केली. मंगळवारी झालेल्या सामन्यात रोहितने मालिकेतील चौथे शतक ठोकले. एकाच विश्‍वचषक स्पर्धेमध्ये चार शतके ठोकणारा रोहित हा पहिला भारतीय ठरला आहे.

एकाच विश्‍वचषक स्पर्धेत चार शतके करण्याच्या विक्रमाची बरोबर केली आहे. एकाच विश्‍वचषक स्पर्धेत चार शतके करण्याचा विक्रम यापूर्वी श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या नावे होता. रोहितने या स्पर्धेमध्ये दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि इंग्लंडविरुद्ध खेळताना शतकी खेळी केली होती. आजही त्याने बांगलादेशविरुद्ध खेळताना 104 धावांची खेळी केली.

या खेळीमध्ये त्याने सहा विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

1) विश्‍वचषकात चार शतके ठोकणारा दुसरा खेळाडू तर पहिला भारतीय.

2) 104 धावांच्या या खेळीमध्ये रोहितने 5 षटकार लगावले. या षटकारांसहीत सलग सहा वर्ष एका वर्षात 30 हून अधिक षटकार मारणारा रोहित पाहिला खेळाडू ठरला आहे.

3) विश्‍वचषक स्पर्धेमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्यांच्या मानाच्या यादीत रोहितने स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक वेगाने पाच शतके करणारा पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ठरला आहे. रोहितने विश्वचषक स्पर्धेमध्ये 15 सामन्यांमध्ये पाच शतके ठोकली आहेत. रोहितच्या आधी हा विक्रम तीनच खेळाडूंनी केला आहे. सचिन तेंडुलकर विश्‍वचषक स्पर्धेत 44 सामने खेळता त्यात त्याने सहा शतके ठोकली. त्या खालोखाल संगाकारा (35 सामने), रिकी पॉटिंग (42 सामने) या दोघांनी प्रत्येकी पाच शतके ठोकली आहेत.

4) 2019 च्या विश्‍वचषकात सर्वाधिक धावा करणारा खेळाडूही तो बनला आहे. त्याच्या खालोखाल वॉर्नर आणि फिंच यांचा क्रमांक लागतो.

5) आयसीसीच्या स्पर्धांमध्ये रोहितचे हे बांगलादेशविरुद्धचे सलग तिसरे शतक ठरले आहे. 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहितने मेलबर्नमधील सामन्यात 137 धावांची खेळी केली होती तर बांगलादेशविरुद्ध बर्मिंगहममध्ये झालेल्या उपान्त्य सामन्यातही त्याने शतक ठोकत 123 धावांची खेळी केली होती.

6) विश्‍वचषक स्पर्धेत 500 धावांचा टप्पा ओलांडणारा रोहित हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी हा विक्रम सचिन तेंडुलकरने दोन वेगवेगळ्या विश्‍वचषक स्पर्धांमध्ये केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)