पवारांच्या पक्षामध्ये अनेक इंमॅच्युअर लोकं – मुख्यमंत्री

मुंबई: भाजपची लोकसभा उमेदवारांची यादी आज (मंगळवार) किंवा उद्या जाहीर होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच अनेक पक्षांमधील मोठे नेते भाजप मध्ये येण्यास उत्सुक असल्याचे फडणवीस म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्जिकल स्ट्राईक बाबत केलेल्या विधानावर मुख्यमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले, “पवार साहेब मॅच्युअर आहेत, ते योग्य वक्तव्य करतील, मात्र त्यांच्या पक्षामध्ये अनेक इंमॅच्युअर लोकं आहेत ते काहीतरी बोलतात, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही” असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

काय म्हणाले होते शरद पवार ?

पुलवामा हल्ल्यानंतरची कारवाई माझ्या सल्ल्यानेच ! -शरद पवार

दरम्यान शरद पवार यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला असल्याचे म्हटले आहे. शरद पवार म्हणाले,

पुलवामा घटनेनंतर केंद्र सरकारने दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. या बैठकीत भारतीय सैन्यदलाच्या पाठीशी राहण्याचा ठराव एकमताने संमत झाला. त्यात माझाही सहभाग होता. काल मावळ लोकसभा मतदार संघातील उमेदवाराच्या प्रचारसभेत पाकव्याप्त काश्मिरमधील बालाकोट आणि इतर ठिकाणचे अतिरेक्यांचे अड्डे हवाई बॉम्ब हल्ल्याने नष्ट करावेत असा सल्ला मी दिल्याचा प्रसारमाध्यमांनी उल्लेख केला.

परंतु तो माझ्या वक्तव्याचा विपर्यास आहे. मी सदर बैठकीत सल्ला दिला नसून केंद्र सरकारच्या या संदर्भातील धोरणास माझ्यासह सर्व राजकीय पक्ष प्रमुखांची संमती होती.

भारतीय सैन्याचा आपणा सर्वांना अभिमान आहे. भारतीय लष्कराचे सामर्थ्य जगाला ठाऊक आहे. १९६५ आणि १९७१ च्या भारत-पाक युद्धात व नंतर कारगिल युद्धात त्याची प्रचिती आली आहे. त्यामुळे पुलवामा घटनेनंतर भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मिर मधील अतिरेक्यांच्या तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती अतिरेकी ठार झाले याची चर्चा व्हायला नको. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संरक्षणविषयक कारवाईचे राजकारण होऊ नये, असे माझे मत आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)