मनू भाकर,अनिश भानवाला यांना नेमबाजीत सुवर्णपदक

मीटिंग ऑफ द शूटिंग होप्स स्पर्धा

नवी दिल्ली: भारताची षोडशवर्षीय नेमबाज मनू भाकरने यंदाच्या मोसमातील आपले सोनेरी घोडदौड कायम राखताना मीटिंग ऑफ द शूटिंग होप्स आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. मनू भाकरचे हे नववे आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक ठरले. तसेच अनिश भानवालानेही आपल्या प्रकारात सुवर्णपदक जिंकून भारताला दुहेरी यश मिळवून दिले.

झेक प्रजासत्ताकातील पिल्सेन येथील मिलिटरी शूटिंग रेंजवर सुरू असलेल्या या स्पर्धेतील महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तोल प्रकारांत मनू भाकरने 238.7 गुणांची कमाई करताना आठ स्पर्धकांच्या अंतिम फेरीत अव्वल स्थानासह सुवर्णपदक पटकावले. तिची नजीकची स्पर्धक फ्रान्सची कॅमिले जेर्झेव्हस्कीने 234.1 गुणांसह रौप्यपदक जिंकले, तर स्लोव्हाकियाच्या मार्टिना मार्सालकोव्हाने 212.9 गुणांसह कांस्यपदकाची निश्‍चिती केली.

अनिश भानवालाने पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तोल प्रकारांतील अंतिम फेरीत 40 पैकी सर्वाधिक 33 गुणांची नोंद करताना सुवर्णपदकाची निश्‍चिती केली. झेक प्रजासत्ताकाच्या मेज रॅमपुलाने 30 गुणांसह रौप्यपदक जिंकले, तर भारताच्याच अन्हाद जावांडाने 21 गुणांची नोंद करताना कांस्यपदकाची निश्‍चिती केली.

वास्तविक पाहता पात्रता फेरीत अन्हाद जावांडाने 674 गुणांसह सर्वोत्तम कामगिरी केली होती. त्या वेळी अनिश भानवाला 571 गुणांसह चौथ्या, तर आदर्श सिंग 568 गुणांसह सहाव्या क्रमांकावर होते. परंतु अनिशने अंतिम फेरीत आपली कामगिरी उंचावीत सुवर्णाला गवसणी घातली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)