टी-20 सामन्यात मलिंगा खेळणार

File photo

कोलंबो – एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यातून आपण निवृत्त होणार असलो तरी टी-20 सामन्यातील आपला सहभाग राहणार आहे असे श्रीलंकेचा द्रुतगती गोलंदाज लसिथ मलिंगा याने सांगितले.

बांगलादेशविरूद्ध होणाऱ्या एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेच्या 22 खेळाडूंचा संघ निश्‍चित करण्यात आला असून त्यामध्ये मलिंगाचा समावेश आहे. हे तीन सामने येथील प्रेमदासा स्टेडियमवर दिनांक 26, 28 व 31 जुलै रोजी होणार आहेत. त्यापैकी पहिला सामना झाल्यानंतर मलिंगा एक दिवसीय सामन्यांमधून निवृत्त होणार आहे.

35 वर्षीय मलिंगाने म्हटले आहे की, शुक्रवारचा सामना माझा अखेरचा वन-डे सामना असणार आहे. चाहत्यांनी या सामन्यास उपस्थित राहून मला निरोप द्यावा. अर्थात मी क्रिकेटमधून निवृत्त होणार नाही. टी-20च्या विश्‍वचषक 2020 च्या स्पर्धेत माझ्या संघास विजेतेपद मिळवून देण्याचे माझे ध्येय आहे. हे यश मिळविण्याची क्षमता आमच्या खेळाडूंमध्ये निश्‍चित आहे. या स्पर्धेसाठी निवडल्या जाणाऱ्या संघात मला स्थान मिळेल अशी आशा आहे. जरी मला या संघात स्थान मिळाले नाही तरी मला त्याचे दु:ख वाटणार नाही. कारण आजपर्यंत मी देशासाठीच खेळलो आहे.

मलिंगाने 2011 मध्ये कसोटी सामन्यांमधून निवृत्ती स्वीकारली होती. मात्र एक दिवसीय व टी-20 सामन्यांमध्ये तो भाग घेत होता. इंग्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या एक दिवसीय विश्‍वचषक स्पर्धेत त्याने 13 विकेट्‌स घेत श्रीलंकेकडून सर्वाधिक गडी बाद करण्याची कामगिरी केली होती. एक दिवसीय सामन्यांमध्ये श्रीलंकेकडून मुथय्या मुरलीधरन (523) व चामिंडा वाझ (399) यांनी मलिंगापेक्षा जास्त विकेट्‌स घेतल्या आहेत.

दृष्टीक्षेपात कामगिरी

कसोटी – 30 सामने, 59 डाव, 101 विकेट्स, 5-50 सर्वोत्तम
वन-डे – 225 सामने,  219 डाव, 335 विकेट्स, 6-38 सर्वोत्तम
टी-20 – 73 सामने, 73 डाव,  97 विकेट्स, 5-31 सर्वोत्तम

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)