वसुली करा, पण वीज कापू नका

महावितरण प्रशासनाची मोहीम : कर्मचाऱ्यांना सूचना

पुणे –
उत्पन्न आणि खर्च यांचा समन्वय साधण्यासाठी महावितरण प्रशासनाने नेटाने प्रयत्न सुरु केले आहेत; त्याचाच एक भाग म्हणून दिवाळीच्या काळातही महसूल वसूलीवरही भर देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, याकाळात थकबाकीसाठी कोणाचाही वीजपुरवठा खंडित करण्यात येऊ नये, असे आवाहन महावितरण प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते.

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या या परिश्रमाच्या बळावरच थकबाकीचा आकडा वीस टक्‍क्‍यांनी कमी करण्यास प्रशासनाला अपेक्षित यश आले आहे. सर्व प्रकारच्या ग्राहकांकडे असलेली थकबाकी, वीजगळती आणि वीजचोरी यामुळे महावितरण प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ बसविताना महावितरण प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

हे वास्तव असतानाच राज्यात भीषण वीजटंचाईला सामोरे जावे लागत असून राज्याचा काही भागाचा अपवाद वगळता अन्य भागात भारनियमन करण्याची वेळ महावितरण प्रशासनावर आली आहे. त्यामुळे प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे, यातून मार्ग काढण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून विविध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, त्यामध्ये अपेक्षित यश आले नाही.

त्यातच हा डोलारा सांभाळत असताना राज्याला अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी प्रशासनाला खासगी वीजनिर्मिती केंद्राकडून जादा दराने वीजेची खरेदी करावी लागत आहे. त्यासाठी प्रशासनाला महिन्याकाठी कोट्यावधी रुपये मोजावे लागत आहेत. मात्र; हे वास्तव असतानाच वाढत्या थकबाकीने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे ही थकबाकी वसूल करण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांच्या कालावधीत नेटाने प्रयत्न करण्यात आले, तरीही त्यामध्ये अपेक्षित यश आले नाही. ही बाब लक्षात घेऊन दिवाळीच्या सणाच्या काळातही नाईलाजाने ही वसूली मोहिम सुरुच ठेवण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला होता. त्यामध्ये प्रशासनाला अपेक्षित यश आले आहे अशी माहिती महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी पी.एस. पाटील यांनी दिली.

उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ बसविण्यासाठी महसूल वसुली गरजेची असल्यानेच सर्व परिमंडलांना वसूलीच्या संदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या असे स्पष्ट करुन पाटील म्हणाले; वीजेचे बील दरमहा भरणे गरजेचे असतानाही बहुतांशी ग्राहकांकडून या नियमांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळेच थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस अधिकच वाढत चालला आहे, त्याची दखल घेऊनच प्रशासनाच्या वतीने ही मोहिम राबविण्यात आली होती. यापुढील कालावधीत ही मोहिम अधिक तीव्र करण्याचा प्रशासनाचा मानस असून त्यामध्ये कोणत्याही थकबाकीदारांची गय केली जाणार नाही, असा इशाराही पाटील यांनी दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)