शेअरबाजार निर्देशांक ऐतिहासिक पातळीवर

नफादायक ताळेबंदाबाबत गुंतवणूकदार आशावादी 
दोन दिवसांत क्रुडच्या दरात तब्बल 5 टक्‍क्‍यांची घट
मुंबई: जागतिक बाजारात तेलाचे दर कमी होऊ लागले आहेत. त्याचबरोबर कंपन्या चांगले ताळेबंद जाहीर करीत आहेत. या बाबी ध्यानात घेऊन गुंतवणूकदारांनी आज मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यामुळे शेअरबाजार निर्देशांक ऐतिहासिक उंचीवर विराजमान झाल्याचे दिसून आले. उर्चा आणि वित्तीय कंपन्यांच्या शेअरची आज मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याचे दिसून आले. रिलायन्स कंपनीचा शेअर आज 4.42 टक्‍क्‍यांनी वधारला. त्याचबरोबर कंपनीचे बाजार मूल्य तब्बल 100 अब्ज डॉलरवर गेले आहे. कंपनीचा शेअर आता 52 आठवडयाच्या उचांकी पातळीवर गेला आहे. सकाळी रुपयाचे मूल्य चांगले वधारले होते. त्याचबरोबर गेल्या आठवड्यापासून परदेशी संस्थागत गुंतवणूकदार खरेदी करीत असल्याचे वातावरण आहे. त्यामुळे खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्याचे ब्रोकर्सनी सांगितले. 
सकाळपासून खरेदी सुरू असल्यामुळे मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स एकवेळ 36699 या ऐतिहासिक उचांकी पातळीवर गेला होता. नंतर थोडी फार नफेखोरी झाली. बाजार बंद होताना सेन्सेक्‍स कालच्या तुलनेत 282 अंकानी म्हणजे 0.78 टक्‍क्‍यांनी वाढून 36548 या पातळीवर बंद झाला. गेल्या पाच सत्रात सेन्सेक्‍स 973 अंकानी वाढला आहे. या अगोदर 29 जानेवारी रोजी निर्देशांक 36283 अंकावर बंद झाला होता. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 74 अंकानी वाढून 11023 अंकावर बंद झाला. कालच्या व्यवहाराबाबत जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार काल देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 15 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली तर परदेशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 636 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. आता परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतीय बाजाराकडे वळत असल्याचे चित्र निर्माण होऊ लागले आहे. गेल्या दोन दिवसात क्रुडचे दर 5 टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांचे आणि प्रवासी विमान वाहतूक कंपन्याचे शेअर मोठ्या प्रमाणात वाढले. मोठे निर्देशांक जरी वाढले असले तरी आज मुंबई शेअरबाजाराचा मिडकॅप 0.52 टक्‍क्‍यांनी तर स्मॉल कॅप 0.06 टक्‍क्‍यांनी कमी झाला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)