कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करा : डॉ. राजेंद्र पिपाडा

मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन दिले निवेदन

राहाता – शिर्डी संस्थानमध्ये 2000 पासून काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे, अशा मागणीचे निवेदन डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. यावेळी राहाता नगरपालिकेच्या नगराध्यक्षा ममता पिपाडा उपस्थित होत्या.

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, साईबाबा संस्थानमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने अनेक कर्मचारी काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांना संस्थानने कायम सेवेत घ्यावे, यासाठी यापूर्वीही आम्ही सतत शासनाकडे पाठपुरावा केला आहे. याप्रश्‍नी आवाज उठविल्यानंतर 3 डिसेंबर 2006 रोजी यातील काही कर्मचाऱ्यांना ठराविक पगारावर घेण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून साईबाबांची सेवा करीत असताना कर्मचाऱ्यांना कायम करण्यासंदर्भातील प्रश्‍नावर सातत्याने उदासीनता दिसून येत आहे.

या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ठोस निर्णय घेण्यात यावा. श्री साईबाबा संस्थानमध्ये जवळपास 2600 कंत्राटी कर्मचारी मागील 12 ते 15 वर्षांपासून नियमितपणे व सलग काम करित आहेत. हे कंत्राटी कर्मचारी मंजूर आकृतिबंधाप्रमाणे संस्थानमध्ये विविध विभागांमध्ये कार्यरत आहेत. कायम कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी यांच्या कामाचे स्वरुप एकच आहे. मात्र कायम कर्मचाऱ्यांना 20 ते 25 हजार, तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना 5 ते 6 हजार रुपये इतका तुटपुंजा पगार दिला जातो.

संस्थानने सन 2006 मध्ये 1052 कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेतलेले आहे. संस्थानने त्यानंतर उर्वरित कंत्राटी कर्मचाऱ्यांना टप्याटप्याने संस्थान सेवेत कायम करू, असे आश्‍वासन दिले होते. मात्र त्यानंतर तब्बल 12 वर्षे होऊनही संस्थानचे कंत्राटी कर्मचारी कायम होण्याची वाट पाहात सेवानिवृत्त झाले आहेत, तर काही जण निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. आऊटसोर्सिंग कर्मचारीही बऱ्याच वर्षांपासून साईबाबा संस्थानमध्ये आपली सेवा देत आहेत. त्यांनाही इनसोर्समध्ये घेऊन कायम करण्याबाबत सकारात्मक विचार करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)