महिंद धरण भरले! 

चारच दिवसांच्या संततधारेने भरले धरण
अतिरिक्‍त गाळ असल्याचा परिणाम
भविष्यात पाणीटंचाईची शक्‍यता
शेतकऱ्यांमधून नाराजी

ढेबेवाडी  – गत आठवड्यापासून सुरू असलेल्या मान्सूनच्या संततधार पावसामुळे ढेबेवाडी विभागातील उत्तर वांग नदीवरील महिंद धरण भरून सांडव्यावरून वाहू लागले आहे. कमी दिवसात धरण भरून वाहू लागल्याने ते पाण्याने भरले आहे की गाळाने असा प्रश्न लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे.

सन 1997 साली युती शासनाच्या काळात उत्तर वांग नदीवर महिंद बांधण्यात आले. सुमारे 85 हजार लक्ष लिटर पाणी साठवण क्षमता असलेले हे धरण आहे. म्हणजेच 1 टी. एम. सी. पेक्षा कमी पाणीसाठा या धरणात होत असून लाभक्षेत्रातील महिंद, बाचोली सणबूर व बनपुरी या गावांना या धरणातील पाण्याचा उपयोग होतो. धरणाची पाणीसाठवण क्षमता कमी आहे. त्यातच धरण बांधल्यापासून म्हणजे सुमारे बावीस वर्षापासून धरणातील गाळ काढण्यात आलेला नाही.

दिवसेंदिवस गाळाचे प्रमाण वाढत चालले असल्यामुळे पाणीसाठवण क्षमतेवर परीणाम झाला आहे.
गतवर्षी शासनाच्या वतीने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही संकल्पना राबवून शेतकऱ्यांना मोफत गाळ नेण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. परंतु शेतकऱ्यांच्या उदानसिनतेमुळे या योजनेला प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी यावर्षीही ही योजना बारगळली. त्यातच गेल्या पाच ते सहा वर्षांपासून धरणाच्या भिंतीतून पाण्याची गळती होत होती. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आ. शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून धरणाच्या जॅकेटींग व सांडव्याच्या कामासाठी 68 लाखांचा निधी दिला होता. त्यामुळे गळती थांबली. पण धरणातील गाळ कधी निघणार व पाणीसाठवण क्षमता केव्हा वाढणार हा प्रश्न शेतकऱ्यातून विचारला जात आहे.

चार दिवसात धरण भरल्याने आश्‍चर्य व्यक्त होत असून यामुळे उन्हाळ्यात या धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. प्रशासनाने किमान पुढच्या वर्षी मे महिन्यात गाळ काढण्यासाठी उपाययोजना आखावी. अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. अन्यथा यावर्षी चार दिवसांच्या पावसामुळे भरलेले धरण पुढील वर्षी दोन दिवसात भरेल. असा उपरोधिक टोला शेतकऱ्यांमधून लगावला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)