समृद्ध जीवन घोटाळा : महेश मोतेवारच्या संपत्तीवर अखेर “टाच’

गुंतवणूकदारांची फसवणूक : मालमत्ता जप्ती आदेशाची अधिसूचना जारी

पुणे – ठेवीदारांकडून स्वीकारलेल्या रकमा विहित मुदतीमध्ये परत करण्यास कसूर केल्याबद्दल समृद्ध जीवन फूडस्‌ इंडिया लिमिटेड आणि या कंपनीचे संचालक असलेले महेश मोतेवार, राजेंद्र भंडारे, लीना मोतेवार, वैशाली मोतेवर, घनशाम पटेल यांच्या मालमत्ता जप्तीच्या आदेशाची अधिसूचना शासनाने प्रसिद्ध केली आहे. जमीन व सदनिका अशा एकूण 137 ठिकाणच्या मालमत्ता, विविध कंपनीच्या नावे व वैयक्तिक अशी एकूण 875 बॅंकांमधील खाते आणि 51 अलिशान चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा यामध्ये समावेश आहे. शासनाच्या या अधिसूचनेमुळे मोतेवार याच्या मालमत्तेवर आता टाच आली आहे.

समृद्ध जीवन आणि या कंपनीचे संचालक असलेल्या या चौघांनी अनेक ठेवीदारांकडून स्वीकारलेल्या ठेवी मुदतीपूर्तीनंतर परत केल्या नाहीत, अशा तक्रारी बहुतांश ठेवीदारांकडून प्राप्त झालेल्या आहेत. या आरोपींविरुद्ध चतुश्रुंगी आणि डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधी संरक्षण अधिनियम, 1999 आणि प्राईस चिटस्‌ अॅॅन्ड मनी सर्क्‍युलेशन स्किमस (बॅनिंग) अॅॅक्‍ट, 1978 नुसार गुन्हे दाखल आहेत. सर्व ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे राज्य शासनाला अशा ठेवीदारांच्या हितसंबंधाचे रक्षण करावे लागेल. त्यामुळे शासनाने समृद्ध जीवन कंपनी आणि त्यांच्या मालमत्ता जप्तीची अधिसूचना प्रसिध्द केली आहे. या अधिसूचनेमध्ये जप्त करण्यात आलेल्या सर्व मालमत्तेचे विवरण प्रसिद्ध केले आहे.

मालमत्तेवर शासनाचे नियंत्रण
महेश मोतेवाच्या या सर्व जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी हवेली उपविभागीय अधिकारी यांची सक्षम प्राधिकारी म्हणून शासनाने नियुक्ती केलेली आहे.

जमीन, सदनिका आणि दुकाने यांची एकूण संख्या 137
पुणे जिल्ह्यातील खळद, देवडी, सासवड, पूर, मलठण, भिगवण, चिंचोली, पर्वती, बाणेर, खडकी, शिवाजीनगर, अकोला जिल्ह्यात अकोला शहर, जामळी बुद्रुक, राजनापूर खिनखिनी, पाचोरा या ठिकाणी जमीन आणि सदनिका आहेत. नाशिक, कोल्हापूर, नागपूर, उस्मानाबाद, सोलापूर या शहरांमध्ये जागा आहेत.

तीन बॅंकांमध्ये 875 खाते
एकट्या अॅॅक्‍सिस बॅंकेमध्ये तब्बल 857 बॅंक खाते आहेत. तर एचएसबीसी बॅंकेमध्ये 14 आणि बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये 4 बॅंक खाते आहेत.

एकूण 51 वाहने
ऑडी, बीएमड्‌ब्लू, लॅन्ड क्रुझर, व्होक्‍स वॅगन, पजेरो, स्कॉर्पिओ या अलिशान वाहनांचा समावेश आहे. त्याचबरोबर इंडिका, इंडिगो, जेसीबी अशा वाहनांचा यामध्ये समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)